सोलापूर : इंडियन टेक्स्टाईल अॅक्सेसरीज अॅण्ड मशिनरी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन आणि टेक्सटाईल डेव्हलपमेंट फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने होटगी रोड वरील हॉटेल बालाजी सरोवर येथे शुक्रवार दि. ७ ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारी ३ ते ८ दरम्यान सोलापुरात प्रथमच वस्त्रोद्योगाच्या वाढीला चालना देण्यासाठी ‘टेक्स्टाईल मशिनरी कॅटलॉग शोचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात ४० हून अधिक कंपन्या त्यांची उत्पादने आणि कॅटलॉग प्रदर्शित करतील. या प्रदर्शनास सोलापूर वस्त्रोद्योगातील सर्व उद्योजकांनी उपस्थित राहून संधीचा लाभ घ्यावा, असे वाहन ITAMMA चे अध्यक्ष पूर्विक पांचाळ आणि टीडीफ चे अध्यक्ष श्रीनिवास बुरा यांनी केले आहे.
सोलापूर हे भारतातील सर्वात मोठा वस्रोद्योग क्लस्टर आहे. विशेषत: टॉवेल आणि चादर / बेड शीटसाठी सोलापूर प्रामुख्याने ओळखला जातो. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दर्जेदार उत्पादनांमध्ये सोलापूर हे महत्त्वाचे योगदान देत आहे. सध्याच्या सुमारे १०० अब्ज डॉलर्सपासून ३५० अब्ज डॉलर्सच्या टेक्स्टाईल उत्पादनाचे निर्धारित लक्ष्य गाठण्यासाठी स्पर्धात्मक किमतीत दर्जेदार उत्पादनांची निर्मिती करणाऱ्या हाय-टेक मशीनचे योगदान महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तीव्र स्पर्धेच्या जागतिक बाजारपेठेत टिकून राहण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या दर्जेदार मशिनरी, अॅक्सेसरीज आणि स्पेअर्स हे उपयोगी ठरणार आहेत. तसेच कमी देखभाल, कमी खर्चात त्यांची कार्यक्षमता टिकवून ठेवण्यास सहाय्यभूत होतील. सोलापूरच्या वस्त्रोद्योगामध्ये अलीकडेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या बऱ्याच मशीनरी आल्या आहेत. येणाऱ्या काळात या आधुनिकीकरणाची गती आणखी वाढणार आहे. त्यामुळे त्यांना चांगल्या गुणवत्तेसह आधुनिक तंत्रज्ञानाच्या मशीनची देखभाल करण्यासाठी चांगल्या सेवा देणाऱ्या पायाभूत सुविधांची आवश्यकता आहे.
‘इंडियन टेक्सटाईल अॅक्सेसरीज अँड मशिनरी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन’ संबंधी थोडक्यात माहिती.
‘इंडियन टेक्सटाईल अॅक्सेसरीज अँड मशिनरी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन’ ही सर्वात मोठी आणि जुनी टेक्सटाईल इंजिनिअरिंग असोसिएशन आहे, ज्याला NABET द्वारे “डायमंड ग्रेड” ने “राष्ट्रीय स्तरावर” मान्यता दिली आहे आणि या श्रेणीतील जबाबदार भारतीय BMOs अंतर्गत राष्ट्रीय स्तरावर ‘पर्यावरण जबाबदारी साठी सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार देखील मिळाला आहे. ITAMMA चे कोईम्बतूर आणि अहमदाबाद येथील संपर्क कार्यालयात 450 हून अधिक सदस्य आहेत आणि ते नियमितपणे “ITAMMA Voice” आणि “Textile Stores & Machinery Directory” प्रकाशित करतात. यातील सदस्यांना त्यांचे ज्ञान समृद्ध करण्यासाठी आणि त्यांचा व्यवसाय वाढवण्यास मदत करण्यासाठी कॅटलॉग शो, मशिनरी प्रदर्शन, सेमिनार, कार्यशाळा इत्यादी सारख्या किफायतशीर आणि वेळ वाचवणारे कार्यक्रम आयोजित केले जातात.