येस न्युज मराठी नेटवर्क । देशाचा प्रजासत्ताक दिन(२६ जानेवारी) अवघ्या काही दिवसांवर आलेला असताना, एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. खलिस्तानी आणि अल कायदा सारख्या दहशतवादी संघटनांकडून या महत्वाच्या दिवशी दहशतवादी हल्ला घडवला जाऊ शकतो, अशी गुप्तचर यंत्रणांकडून दिल्ली पोलिसांना माहिती मिळाली आहे. यानंतर आता दिल्ली पोलीस अधिकच सतर्क झाले असून, सुरक्षा व्यवस्था अधिकच कडक करण्यात आली आहे.
या माहितीच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांकडून काही वॉण्टेड दहशतवाद्यांचे पोस्टर देखील जागोजागी लावण्यात आले आहेत. तसेच, संशयितांची शोधमोहीम देखील सुरू करण्यात आली आहे. सध्या दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा फायदा घेत, प्रजासत्ताक दिनी दहशतवादी कारवाई घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.