जम्मू काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे मोठा दहशतवादी हल्ला टळला आहे. जम्मू काश्मीर पोलिसांनी येथे 5-6 किलो IED सह एका दहशतवाद्याला अटक केली. इश्फाक अहमद वानी असे या दहशतवाद्याचे नाव आहे. तो पुलवामाच्या अरिगामचा रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे. काश्मीर झोन पोलिसांनी रविवारी ही माहिती दिली. आरोपी इश्फाककडून सुमारे 5-6 किलो आयईडी जप्त करण्यात आला आहे. आरोपीची रवानगी कोठडीत करण्यात आली आहे.

या महिन्यात 22-24 मे रोजी श्रीनगर येथे G20 ची बैठक होणार आहे. हे लक्षात घेऊन लष्कराकडून कारवाई सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच पूंछमध्ये दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनावर हल्ला केला होता. दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनावर ग्रेनेड फेकले, त्यामुळे वाहनाला आग लागली. या हल्ल्यात पाच जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना पकडण्यासाठी लष्कराने शोधमोहीम सुरू केली आहे.