सातारा, प्रतिनिधी : साताऱयाचे तत्कालीन स्थानिक गुन्हेचे निरीक्षक पद्माकर घनवट व हवालदार शिर्के यांनी दरोडय़ाला मदत केली व बेकायदा डांबून ठेवल्याप्रकरणी कारवाईची टाळाटाळ करण्याऱ्या सध्याच्या सोलापूरच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची खंडपीठापुढे चौकशी होणार आहे. गुरुवार 14 जानेवारीला होणाऱ्या या सुनावणीकडे साऱ्या पोलीस दलाच्या नजरा लागल्या आहेत.
सवयभान चळवळीचे संस्थापक राजेंद्र चोरगे यांना बेकायदा डांबून ठेवणे, दरोड्याला मदत करणे, टॉर्चर करत लाखो रूपयांची लाच स्विकारणे असे गंभीर आरोप गुन्हे अन्वेषणचे पद्माकर घनवट व हवालदार शिर्के यांच्यावर होते. दरम्यान राजेंद्र चोरगे यांनी सबळ पुरावे दिल्याने शिर्के याला निलंबीत करण्यात आले. मात्र, घनवट याला पाठीशी घातले गेले.
राजेंद्र चोरगे यांनी घनवटला पाठीशी घातल्याचा आरोप केला होता त्याची दखल घेत तत्कालिन पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी साहाय्यक पोलीस अधीक्षक समिर शेख यांच्याकडून नि:पक्ष चौकशी करून अहवाल घेतला. मात्र, त्यांची बदली झाल्याने तेजस्वी सातपुते यांनी चार्ज घेवून या प्रकरणी पुन्हा घनवटला पाठीशी घातले.
उच्च पोलीस अधिकाऱ्याकडून चौकशी पूर्ण झाली असतानाही सातपुते यांनी हा अहवाल फिर्यादी राजेंद्र चोरगे यांना न देता दुबार चौकशी करवण्याचा घाट घालत घनवट वर कारवाई करण्यापेक्षा त्याला पाठीशी घातले.
सातपुते यांनी अप्पर पोलीस अधीक्षकांकडून पुन्हा अहवाल बनवून घेतला. मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे कारवाई करण्यापेक्षा पद्माकर घनवटला पाठीशी घातल्याच्या गंभीर आरोपांनी हे प्रकरण गाजले होते.
दरम्यान, राजेंद्र चोरगे यांनी राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाकडे धाव घेतली व सातपुते यांच्यावरही तक्रार दाखल केली. त्याप्रमाणे या प्राधिकरणाने तेजस्वी सातपुतेंर्चीं निवृत्त न्यायाधिश श्रीहरी डावरे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे सुनावणी ठेवली आहे. गुरूवार 14 जानेवारी रोजीच्या या सुनावणीत पूर्ण न्याय मिळेल असा विश्वास राजेंद्र चोरगे यांनी व्यक्त केला आहे. तेजस्वी सातपुते या सध्या सोलापूरच्या अधीक्षक आहेत. तर घनवट राज्याच्या विविध जिल्हय़ात स्थानिक गुन्हे शाखेतच कार्यरत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.