लोकमंगल फाउंडेशन च्या वतीने शिक्षक रत्न पुरस्काराचे थाटात वितरण
सोलापूर : विद्यार्थी घडवण्यामध्ये शिक्षकांचा मोठा वाटा आहे. हे काम करताना शिक्षकांना अनेक अडचणी आल्या आणि यापुढेही येणार आहे. तरी शिक्षकांनी कर्तव्यात कसूर न करता प्रामाणिकपणे विद्यार्थी घडवण्याचे कार्य करावे, असे प्रतिपादन प्राध्यापक इंद्रजीत भालेराव यांनी केले.
लोकमंगल फाउंडेशन व लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमंगल शिक्षकरत्न आणि आदर्श शाळा पुरस्काराचे वितरण रविवारी किर्लोस्कर सभागृहात करण्यात आले, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. भालेराव बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सुभाष देशमुख होते.
यावेळी व्यासपीठावर डॉ. ह. ना. जगताप, आशालता जगताप , पतसंस्थेचे चेअरमन गुरण्णा तेली यांच्यासह निवडकर्ते नागनाथ नेमते, बाळासाहेब वाघ आदी उपस्थित होते.
प्राध्यापक भालेराव पुढे म्हणाले की, शिक्षकांनी कायम विद्यार्थ्यांना नवीन काही शिकवता येते का याचा ध्यास ठेवला पाहिज. कोरोनाच्या काळामध्ये संपूर्ण शाळा बंद असताना शिक्षकांनी ऑनलाइनद्वारे विद्यार्थ्यांना शिकवले. शिक्षकांनी एखादी गोष्ट जर मनावर घेऊन केली तर त्यात यश नक्की मिळते आणि त्यातून विद्यार्थ्यांना फायदाच होतो. यावेळी भालेराव यांनी लोकमंगलच्या वतीने देण्यात येणाऱ्या शिक्षकरत्न पुरस्कार उपक्रमाचे कौतूक करत आगामी काळात यामध्ये कोणताही खंड पाडू नये अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी आ. सुभाष देशमुख म्हणाले की, जे चांगले काम करतात त्यांची कदर कायम होते. आज ज्यांना पुरस्कार मिळाले ते शिक्षक जिल्हाची ताकद आहेत. त्यांच्यामुळे विद्यार्थी विकसित होतो. विद्यार्थी विकसित झाला की राष्ट्र विकसित होते. त्यामुळे शिक्षक ही राष्ट्र घडवणारी यंत्रणा आहे. आज शिक्षकांना पुरस्कार मिळाले आहे त्यामुळे त्यांची जबाबदारी आणखीन वाढली आहे. आपल्या कामाला कोणी कितीही नावे ठेवले तरी त्याकडे लक्ष न देता शिक्षकांनी आपले काम करावे. चांगले आणि संस्कारक्षम विद्यार्थी घडवावेत.
यावेळी रोहिणी चौधरी, परमेश्वर सोलके, अश्विनी वाघमोडे, समीर मल्ली, प्रशांत चाबुकस्वार , राजकुमार नेमते, आबाराव गावडे, पैगंबर तांबोळी , संजय चौधरी यांना आदर्श शिक्षक पुरस्कार तर अक्कलकोट तालुक्यातील गुड्डेवाडी जि. शाळा , मोहोळ तालुक्यातील पाथरी जिल्हा परिषद शाळेला आदर्श शाळा पुरस्कार देण्यात आला. पुरस्कार शिक्षकांच्या वतीने प्राध्यापक संजय चौधरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ. जगताप यांनी केले तर सूत्रसंचालन पत्रकार अरविंद जोशी यांनी केले.