मुंबई : विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पाच जागांवर महाविकास आघाडीने सरशी केली आहे. मराठवाडा पदवीधर मतदार संघ निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी विजय मिळवला आहे तर पुणे पदवीधर मतदारसंघातुन महाविकास आघाडीच्या अरुण लाड यांनी विजय मिळवला आहे. नागपूर पदवीधर विधानपरीषदेच्या निवडणुकीत कॉंग्रेस व महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत वंजारी विजयी झाल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. तर पुणे विभागातील शिक्षक मतदारसंघातील मतमोजणी ही बाद फेरीपर्यंत पोहोचली असून काँग्रेसचे जयंत आसगावकर हे आघाडीवर आहेत. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात अपक्ष सरनाईक आघाडीवर आहेत.
मराठवाडा पदवीधरमध्ये सतीश चव्हाण विजयी, बोराळकरांवर केली मात
मराठवाडा पदवीधर मतदार संघ निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांचा विजय झाला. चव्हाण यांनी सलग तिसरा विजयाची हॅटट्रिक पूर्ण केली. महाविकास आघाडीमुळे फायदा झाला आणि मताधिक्य वाढलं अस मत विजयी उमेदवार सतीश चव्हाण व्यक्त केलं. पहिल्या फेरी पासून सतीश चव्हाण यांनी घेतलेली आघाडी पाचव्या फेरीपर्यंत कायम राहिली. सतीश चव्हाण यांना एकूण 116638 मते मिळाली. तर भाजपचे शिरीष बोराळकर यांना 58743 मते मिळाली. पाचव्या फेरी अखेर सतीश चव्हाण 57895 मतांनी विजयी घोषित करण्यात आले. मराठवाडा पदवीधर मतदार संघ निवडणुकीत 35 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते.