येस न्युज मराठी नेटवर्क : शहरातील एका तरुण युवकाने आपले ऑटोमोबाईल शिक्षण श्री. दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला व कष्ठि महाविद्यालय येथे करत असताना तेथे त्यांचे ऑटोमोबाईल क्षेत्रातील शिक्षक संजय कुरनुरकर व संपतकुमार झळके यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले पुढे तसेच पुढील शिक्षण हे एस.ई.एस. पॉलिटेक्निक, सोलापूर कॉलेजमधून वर्ष २०१०-११ मध्ये पुर्ण केले.
अत्यंत प्रतिकुल परिस्थितीतून त्याने पुढील पदवी पुणे येथे AISSMS College of Engineering या इंजिनीअरींग कॉलेज मध्ये २०१४-१५ पुर्ण केले. त्या दरम्यान २०१० मध्ये एका खाजगी गॅरेज मध्ये काम करत असतांना त्याला चारचाकी गाड्यांमधून होणारे प्रदुषण कमी करण्यासाठी एक कल्पना सुचली व त्याने त्यावर तब्बल २ वर्षे संशोधन करून चारचाकी गाड्यांमधील प्रदुषणाची तीव्रता कमी करण्यासाठी एक पार्ट बनविला. हा पार्ट इंडीयन स्टैंडर्ड नॉर्म्स नुसार बनविला असून तो दोन-तीन मोटार कंपनीना व लॅब टेस्टिंगसाठी बेंगलोर व दिल्ली येथे तपासणी साठी पाठविला होता व त्याचे पेटंट देखील घेण्यासाठी अथक परीश्रम घ्यावे लागले व सततच्या पाठपुराव्यानंतर शेवटी २०२२ मध्ये पेटंट मिळवले. तब्बल १०-११ वर्षाच्या मेहनतीनंतर कंपनी टाटा व फोर्ड मोटार्स आणी महिन्द्र अॅन्ड महिन्द्रा लिमिटेड कंपनीने त्याच्या या पार्टचे महत्व ओळखुन त्याच्याकडून हा पार्ट भारतातील दिग्गज मोटार टाटा मोटार्स कंपनीने (१३ कोटी ५२ लाख रुपयांना) विकत घेण्याचे ठरविले. राहुल बसवराज बुन्हाणपुरे अशा या तरुणाचे नाव मध्यमवर्गीय असलेले त्यांचे वडील सोलापूरातील मोगले साडी सेंटर मध्ये काम करत असून, आई गृहीणी आहे.
राहूल यांनी बनविलेला हा पार्ट चार चाकी गाड्यांची दुषित हवा बाहेर फेकल्या जाणाऱ्याा ठिकाणी म्हणजेच सायलेन्सर जवळ बसविला जातो. सध्याच्या वाहनांमध्ये १९९० पासुन ई.जी. आर. सिस्टमचा वापर केला जातो, त्याच ई.जी. आर. म्हणजेच (Exhaust Gases Recycle) पार्टचे काम प्रभावीपणे होण्यासाठी हा पार्ट उपयोगी पडतो. पी.सी.एम. या सेन्सरद्वारे हा पार्ट नियंत्रित केला जातो. त्यामुळे सायलेन्सद्वारे बाहेर फेकली जाणारी ३० टक्के दुषित हवा या पार्टद्वारे पुन्हा रिसायकल होवून इंजिनमध्ये सोडली जाते. त्यामुळे प्रदुषणात सरासरी ३० टक्के एवढी घट तर होतेच तसेच नायट्रोजन ऑक्साईड ही ७० टक्के कमी करण्यात याची मदत होते, या शिवाय गाडीचे मायलेज ही सुधारते. नायट्रोजन ऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, हायड्रोकार्बन यासारखे घातक वायु चार ाकी वाहनांमधुन उत्सर्जित केले जातात. त्यातील नायट्रोजन ऑक्साईड हा मानवी शरीरावार सर्वात जास्त नुकसानदायक असून या पार्टद्वारे त्याचा प्रभाव कमी होणार आहे.
भारतातीलच नव्हे तर जगातील वाढती वाहनांची संख्या व त्यामुळे होणारे प्रदुषण ही जातिक समस्या बनत असतांना सोलापूरसारख्या छोटयाशा शहरातील एका तरुणाने भविष्यातील प्रदुषणाच्या समस्येवर अशा प्रकारचे आशादायी संशोधनाचे कार्य केले आहे. त्याची दखल टाटा मोटर्स ने तर घेतली आहेच. याशिवाय भारत सरकारने व स्थानिक संस्थेने ही त्याच्या या कार्याची दखल घेणे आवश्यक आहे. साधारणतः पुढील वर्षापासून म्हणजेच २०२४-२५ नंतर टाटा मोटर्स कडून या पार्टचा वाहनांमध्ये वापर सुरु होणार असून त्याचा आम्हां सोलापूरकरांनाही सार्थ अभिमान वाटत आहे.