सोलापूर, ता. 25 : सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगाच्या समस्या सोडविण्यासाठी टास्क फोर्स नेमण्यात येणार आहे, अशी माहिती इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊटंटस् ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) एमएसएमई व स्टार्टअप इंडिया कमिटीचे चेअरमन सीए धीरज खंडेलवाल यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
खंडेलवाल म्हणाले की, आयसीएआयकडून उद्योगांसमवेत विकासाच्या मुद्यावर काम करण्यात येणार आहे. याअंतर्गत देशभरातील उद्योगांच्या समस्यांचा अभ्यास करण्यात येणार आहे. हे प्रश्न केंद्र सरकारपुढे मांडून त्याची सोडवणूक कशी करता येईल याकरिता प्रयत्न करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या उद्योगविषयक योजनांचा लाभ पोहोचविण्याबरोबरच उद्योगवाढीबाबत भर देण्यात येणार आहे. यासंदर्भात वेळोवेळी तज्ञांचे वेबीनार घेण्यात येतील. एमएसएमईसंदर्भात उद्योजकांची नोंदणी करण्यात येईल. याकरिता शिबिरे घेण्यात येतील.
यावेळी चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी यांनी सांगितले की, आयसीएआयतर्फे सर्वत्र उद्योजकांशी सुसंवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून सोलापुरात याबाबतचा कार्यक्रम घेण्यात आला. कोरोनामुळे धास्तावलेल्या उद्योजकांना एमएसएमईचे फायदे काय आहेत याची माहिती देण्यात आली आहे. लवकरच एमएसएमईसंदर्भात नोंदणीचे काम चेंबर ऑफ कॉमर्स व सीए असोसिएशन सोलापूर शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात येणार आहे. नोंदणीकृत उद्योजकांना बॅंक व्याज दरात दोन टक्के सवलतीबरोबरच पाच लाखांपेक्षा अधिक खेळत्या भांडवलाचा लाभ होणार आहे.
सीए असोसिएशन सोलापूर शाखेच्या अध्यक्षा निलाशा नोगजा म्हणाल्या की, उद्योजकांच्या समस्यांचे निराकरण व्हावे हा असोसिएशनचा उद्देश आहे. शासकीय योजनांबाबत विविध उद्योजकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासठीा चेंबर व सीए असोसिएशनकडून आगामी काळात शिबिरे घेण्यात येतील.