मुंबई : काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना लखीमपूर येथे जाण्यापासून उत्तर प्रदेशातील पोलिसांनी रोखलं आहे. त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संताप व्यक्त केला आहे. उत्तर प्रदेशात तालिबानी राज सुरू आहे. पीडित कुटुंबांना भेटणं भाजपच्या राज्यात गुन्हा आहे का?; असा संतप्त सवाल नाना पटोले यांनी केला आहे. तसेच प्रियंका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या घटनेचाही नाना पटोले यांनी निषेध केला.
नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेऊन हा संतप्त सवाल केला. मोदी सरकारमधील गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाच्या कारने शेतकऱ्यांना चिरडले. मंत्र्यांच्या मुलावर कारवाई करण्याऐवजी त्याला वाचवण्यासाठी अजयसिंह बिष्ट यांचे सरकार आटापिटा करत आहे. तर पीडित शेतकरी कुटुंबियांना भेटून त्यांचे अश्रू पुसण्यासाठी जात असताना काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी, खासदार दिपेंदर हुड्डा व काँग्रेस कार्यकर्ते यांच्याशी पोलीसांनी गैरवर्तन के तसेच त्यांना बेकायदेशीरपणे ताब्यात घेतलं आहे. उत्तर प्रदेशात लोकशाहीचा गळा घोटला जात असून शेतकरी, दलित, वंचित, अल्पसंख्यांक समाजावर अन्याय व अत्याचार केले जात आहेत, पीडित कुटुंबियांना भेटू दिले जात नाही, असा आरोप पटोले यांनी केला.