काबूल : अमेरिकेने अफगाणिस्तानातून आपले सैन्य माघारी घेतल्यापासून देशात तालिबानची क्रूरता वाढत आहे. तालिबानने एकापाठोपाठ एक क्षेत्रांवर अतिशय वेगाने ताबा मिळवला आहे. यानंतर आता तालिबानच्या सैनिकांनी भारताने अफगाणिस्तानात बांधलेल्या देलाराम-झरांज महामार्गावरही ताबा मिळवला आहे. सध्या देशाचा जवळपास 80 टक्के भाग तालिबानच्या ताब्यात गेला आहे. अन्य भागासाठी तालिबान हिंसक हल्ले करत आहे. तालिबानच्या भीतीने दुर्गम प्रांतात राहणारे लोक काबूलमध्ये स्थलांतरित होत आहेत. त्यामुळे काबुलमध्ये अनेक ठिकाणी कॅम्प लावल्याचे चित्र दिसत आहे.
इराण सीमेजवळील जरांज याठिकाणी मिळवलेला ताबा तालिबानसाठी मोठा धोरणात्मक विजय आहे. अफगाणिस्तानातून इराणकडे जाणाऱ्या 217 किलोमीटर लांबीच्या देलाराम-झरांज महामार्गावरून अफगाणिस्तानचा व्यापार होतो. काबूलमधील एका ज्येष्ठ पत्रकाराच्या मते, या महामार्गावर ताबा मिळवणं हा अफगाणिस्तान सरकारसाठी मोठा धक्का आहे. कारण या मार्गावरून होणारा व्यापार आता तालिबानी संघटनेच्या नियंत्रणाखाली जाण्याची शक्यता आहे.
भारताची 300 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक धोक्यात
गेल्या 20 वर्षांत भारत सरकारनं रस्ते, आरोग्य, शिक्षण, धरण, वीज प्रकल्पांसह अनेक प्रकल्पांमध्ये सुमारे 300 दशलक्ष डॉलर्सहून अधिक गुंतवणूक केली आहे. भारतीय गुंतवणूक सुरक्षित करण्यासाठी 2002 मध्ये भारताने अफगाणिस्तानातील भारतीय दूतावासाचा विस्तार केला होता. पण सध्या अफगाणिस्तानात तालिबानचा वाढता धोका लक्षात घेता. याचा भारताला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.