सोलापूर – राष्ट्रीय विज्ञान दिना निमित्त सायंकाळी 6 वाजता समाज कल्याण सभागृह रंगभवन येथे तळभंडारे फाउंडेशन आणि तळभंडारे विज्ञान शिक्षण आणि उपक्रम केंद्राचे उद्घाटन उत्साहात पार पडले.
सामाजिक कार्य अधिक संघटित आणि परिणामकारक व्हावे, तसेच पर्यावरण, मानवता, शिक्षण, जैवविविधता, पुरातत्त्व आणि विज्ञान या क्षेत्रांत विधायक उपक्रम राबवावेत या उद्देशाने डॉ. सिद्धार्थ तळभंडारे यांनी फाउंडेशनची स्थापना केली असल्याचे त्यांनी प्रास्ताविकात सांगितले.तळभंडारे फाउंडेशन हे नाव देण्याचा हेतू स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की तळभंडारे हे सोलापूरचे मूळ वतनदार आहेत आणि त्यांच्या सामाजिक कार्याची पायाभरणी मागच्या 200 ते 300 वर्षांपूर्वी झालेली आहे त्याला आज नोंदणीकृत करून मूर्त स्वरूप देण्यात आले.







कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्रातील शिक्षणतज्ज्ञ डॉ. एच. एन. जगताप उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी डॉ. आशालता जगताप लाभल्या. मार्गदर्शन करताना डॉ. जगताप यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले की, विज्ञान हे केवळ पुस्तकापुरते मर्यादित नसून प्रयोग, निरीक्षण आणि अनुभवातून समजून घ्यावे. कोणतीही गोष्ट कार्यकारणभाव लक्षात घेऊन तपासून पाहण्याची वृत्ती जोपासावी.
यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ येथील भूशास्त्र संकुल संचालक व विभाग प्रमुख डॉ. विनायक धुळप यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली.
उद्घाटनानिमित्त सोलापूर शहरातील विविध शाळांमध्ये “विज्ञान आणि मानवी जीवन” या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपली वैज्ञानिक दृष्टी मांडली.
विजेत्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
विज्ञान केंद्राचे उद्दिष्ट,आकाश निरीक्षण, जैवविविधता संवर्धन, प्रयोगशील विज्ञान, तसेच पर्यावरण जनजागृती या संकल्पनांप्रमाणेच केंद्रामार्फत आकाश निरीक्षण शिबिरे,जैवविविधता अभ्यास उपक्रम,विज्ञान प्रदर्शन व प्रयोग, कार्यशाळा,विद्यार्थ्यांसाठी संशोधनाभिमुख उपक्रम अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन प्रा. रेश्मा माने यांनी केले, तर आभार प्रदर्शन सोनवणे यांनी मानले. संस्थेच्या सचिवा मंदाकिनी तळभंडारे तसेच प्रा.डॉ.सचिन इंगळे व प्रा.डॉ. पुष्पांजली इंगळे व मनमोहन भोसले यांचे सहकार्य लाभले.

