लॉकडाऊनच्या सावटाखाली वटवृक्ष मंदीरात साध्या पध्दतीने उत्सव संपन्न
अक्कलकोट : कोरोना संसर्गाच्या पाश्वभूमीवर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व श्री स्वामी समर्थांचे मूळस्थान असलेल्या येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानात श्री स्वामी समर्थांचा १४३ वा पुण्यतिथी सोहळा कोणत्याही भाविकांविना अत्यंत शांत वातावरणात आज संपन्न झाला. श्री स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त दरवर्षी आयोजित करण्यात येणारे विविध धार्मिक कार्यक्रम यंदा कोरोनामुळे भाविकांची गर्दी टाळण्याकरिता रद्द करण्यात आले.

सध्या कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता गांभीर्य पूर्वक काळजी म्हणून शासन व जिल्हाधिकारी साहेबांच्या निर्देशाचे पालन करीत मंदिर समितीने पुढील आदेश येईपर्यंत भाविकांना स्वामींच्या दर्शनाकरीता मंदिर बंद ठेवले आहे. मंदिरातील नित्य पूजा व दिवसातील तीनही आरती चालू आहेत. या पाश्वभूमीवर आज रविवार दिनांक ९ मे रोजी पहाटे ५ वाजता श्रींची पुण्यतिथी महोत्सवाची काकड आरती मंदिराचे पुजारी मोहन महाराज यांच्या हस्ते व समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या उपस्तिथीत करण्यात आली. यानंतर मंदिर समितीच्या वतीने चेअरमन महेश इंगळे यांच्या हस्ते श्रीना लघुरुद्र अभिषेक करण्यात आले. सकाळी ११:३० वाजता देवस्थानची नैवेद्य आरती संपन्न झाली. दुपारी १२ वाजता अक्कलकोट संस्थानच्या वतीने मालोजीराजे भोसले यांचे हस्ते व देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्तिथीत पुरोहित मंदार पुजारी यांच्या मंत्रोच्चारात श्रींना महानैवेद्य दाखविण्यात आले.
यानंतर सायंकाळी अक्कलकोट शहरातून प्रतिवर्षी संपन्न होणारा पालखी सोहळा यंदा रद्द करण्यात आला. अशा प्रकारे यंदाही कोरोनाच्या सावटाखाली संपन्न झालेले श्री स्वामी समर्थांचे १४३ वे पुण्यतिथी महोत्सव या ही वर्षी कोणत्याही भाविकांच्या अनुपस्थितीत अत्यंत साध्या पद्धतीने संपन्न झाले. या पुण्यतिथी महोत्सवानिमीत्त वटवृक्ष मंदीरास पुणे येथील लाईट डेकोरेटर्स पुंडलिक हगवणे यांच्या वतीने मिलिंद पोकळे व सहकाऱ्यांनी आकर्षक विद्युत रोषणाईची सेवा स्वामीं चरणी अर्पण केली आहे. या प्रसंगी मंदिरात मोजक्या संख्येने उपस्थित असलेले विश्वस्त सदस्य व सेवेकऱ्यांना मास्क व सॅनिटायजर वापरण्याची सक्ती करण्यात आली. याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त उज्वलाताई सरदेशमुख, गणेश दिवाणजी, गिरीश ग्रामोपाध्ये इत्यादी उपस्थित होते.