सोलापूर : विजापूर रोडवरील नागेश ऑर्केस्ट्रा बार छापा प्रकरणात निलंबित असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील यांचे निलंबन मागे घेण्यात आले असून तसा आदेश आयुक्त हरीशकुमार बैजल यांनी बुधवारी सायंकाळी दिला. विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत निर्बंध असतानाही नागेश बार सुरू होता. त्याबद्दल पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून पाटील यांना जबाबदार धरुन आयुक्त हरीश बैजल यांनी उदयसिंह पाटील यांना निलंबित केले होते. त्यानंतर काही दिवसातच डीबी पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार कोल्हाळ यांनाही निलंबित केले होते. बुधवारी सायंकाळी आयुक्त यांनी पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील यांचे निलंबन मागे घेतले. या बातमीला पाटील यांनीही दुजोरा दिला आहे. मात्र अद्याप आपल्याला आदेश प्राप्त झाला नसल्याचे त्यांनी सांगितले.
निलंबित करण्याची गरजच नव्हती : पाटील
या प्रकरणात आपल्याला निलंबित करण्याची गरजही नव्हती. निलंबन रद्द होणार होतेच. आता त्याची मला माहिती मिळाली आहे. मात्र आदेश अजून मिळाला नसल्याचे पाटील यांनी सांगितले.