मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी आढळून आली होती. या प्रकरणाचा तपास एटीएस करत आहे. एटीएसच्या तपासात मोठा खुलासा झाला आहे. एटीएसच्या माहितीनुसार, उद्योजक मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाच्या परिसरात दिसलेल्या इनोव्हा गाडीचा ड्रायव्हर पुन्हा अँटिलिया परिसरात आला होता. आपली ओळख लपवण्यासाठी त्याने पीपीई किट घातलं होतं. या भागात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा संशयित आरोपी कैद झाला आहे. परंतु पीपीई किट घातलं असल्याने त्याची ओळख पटलेली नाही.
संशयिताने मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानापासून 500 मीटर अंतरावर स्कॉर्पिओमध्ये 20 जिलेटिनच्या कांड्या ठेवल्या होत्या. त्यानंतर स्कॉर्पिओचा चालक इनोव्हा गाडीतून पळून गेला होता. स्कॉर्पिओ गाडीच्या चालकाला मुलुंड टोल नाका पार केल्यावर पुन्हा एकदा अँटिलिया येथे पाहण्यात आलं. रात्री 3 वाजून 05 मिनिटांना इनोव्हा गाडी मुंलुड टोल नाका पार करताना दिसली होती. त्यानंतर पुन्हा अँटिलिया येथे दिसून आली.