तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाला मिचेल स्टार्कच्या नेतृत्वात खेळणाऱ्या कांगारू संघाच्या वेगवान गोलंदाजांच्या आव्हानाला सामोरं जावं लागणार आहे. तिसऱ्या वनडेत भारतीय फलंदाजांना आपली ताकद दाखवावी लागणार आहे.
टीम इंडिया आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेतील निर्णायक सामन्यासाठी सज्ज झाली आहे. हा सामना आज (22 मार्च) दुपारी 1.30 पासून चेन्नई येथे खेळवला जाईल. सध्या तीन सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. त्यामुळे आजचा सामना निर्णायक असणार आहे.
तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाला मिचेल स्टार्कच्या नेतृत्वात खेळणाऱ्या कांगारू संघाच्या वेगवान गोलंदाजांच्या आव्हानाला सामोरं जावं लागणार आहे. तिसऱ्या वनडेत भारतीय फलंदाजांना आपली ताकद दाखवावी लागणार आहे. खरं तर ऑस्ट्रेलियाचा स्टार्क टीम इंडियाच्या फलंदाजांसाठी डोकेदुखी ठरतोय, तर मिचेल मार्शनं टीम इंडियाच्या गोलंदाजांची झोपच उडवली आहे. त्यानं दोन सामन्यांत सुमारे डझनभर षटकार मारले आहेत. त्यामुळे मार्शला रोखण्याचं आव्हान आज टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर असणार आहे.
टीम इंडियाच्या फलंदाजांचा कस लागणार
रोहित शर्मा, विराट कोहली, शुभमन गिल आणि सूर्यकुमार यादव टीम इंडियाच्या या स्टार चौकडीचा स्टार्कचा सामना करताना पुरता कस लागणार आहे. भारताच्या फलंदाजांना आपल्या खेळीत बदल करुन नव्या योजना आमलात आणाव्या लागतील.
भारतातील मर्यादित षटकांचे सामने सपाट खेळपट्ट्यांवर खेळले जातात. ज्यासाठी जास्त फूटवर्क आवश्यक नसतं. फ्रंट फूटवर खेळून फलंदाज चांगली कामगिरी करू शकतो. पण स्टार्कनं सगळी समीकरणंच बदलून टाकलीत. त्याचे चेंडू एकतर मधल्या स्टंपला किंवा लेग मिडलच्या दिशेनं आदळतात.
सूर्या प्लेईंग इलेव्हनमध्ये खेळणार?
गेल्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये सूर्यकुमार आपलं खातंही खोलू शकला नाही. दोन्ही वेळेस सूर्या गोल्डन डकचा बळी पडला. तर दुसरीकडे टी20 क्रिकेटमध्ये मात्र सूर्याला तोड नाही. ICC क्रमवारीतही त्यानं मानाचं स्थान मिळवलंय. श्रेयस अय्यर संघात नाही, सध्या दुखापतीमुळे तो संघाबाहेर आहे. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यांसाठी सूर्याचा संघात समावेश करण्यात आला आहे. अशातच यंदा होणाऱ्या विश्वचषकासाठी संघात अढळ स्थान निर्माण करण्याची सुवर्णसंधी सूर्याकडे होती, पण सूर्याला या संधीचा फारसा फायदा उचलता आलेला नाही.
दुसऱ्या वनडेनंतर कर्णधार रोहित म्हणाला होता, “आम्ही पाहिले आहे की, तो एकदिवसीय सामन्यातही चांगला खेळू शकतो. हे त्यालाही माहीत आहे. मला वाटतं की, क्षमता असलेल्या खेळाडूंना पुरेशा संधी मिळत नाहीत, असा त्यांचा समज होऊ नये. सूर्याला शेवटच्या दोन सामन्यांमध्ये आपल्या खेळीनं जादू दाखवता आली नाही. पण त्याला काही संधी आणखी देण्याची गरज आहे.”
आजच्या एकदिवसीय सामन्यासाठी दोन्ही संघ
टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव/वॉशिंगटन सुंदर, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.
टीम ऑस्ट्रेलिया : डेविड वॉर्नर, ट्रेविस हेड, स्टीव स्मिथ (कर्णधार), मिचेल मार्श, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), कॅमरन ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोइनिस, सीन एबॉट/एश्टन एगर/नाथन एलिस, मिचेल स्टार्क आणि एडम जम्पा.