प्रिसिजन संगीत महोत्सव
सोलापूर प्रतिनिधी : प्रिसिजन फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रिसीजन संगीत महोत्सवाच्या कार्यक्रमांमध्ये अनुपम जोशी यांच्या सरोद वादनाने आणि पंडित डॉ हरीश तिवारी यांच्या गायनाने रसिक तल्लीन झाले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन प्रिसिजन कंपनीचे चेअरमन यतीन शहा, प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ सुहासिनी शहा, प्रिसिजनचे कार्यकारी संचालक करण शहा, संचालक रवींद्र जोशी सरोद वादक अनुपम जोशी,शंतनु देशमुख, यांच्या हस्ते दीप्रज्वलन करण्यात आले.
सांजवेळचे ६.२५. भारतीय संगीतातली संधी प्रकाश ही भावूक वेळ. हुतात्मा स्मृती मंदिराचा पडदा उघडतो आणि प्रिसिजन संगीत महोत्सव २०२४ चा प्रारंभ होतो. दीपकळ्या फुलल्या. पाठोपाठ स्वरकळ्या फुलू लागल्या. वीररस व काहीशा गंभीर प्रकृतीच्या ‘श्री’ रागाचे स्वर श्राेत्यांच्या काळजाची पकड घ्यायला लागले. सेनिया मैहर घराण्याचे वादक अनुपम जोशी यांची बोटे सरोदवर फिरू लागली आणि कोमल रिषभ रसिकांच्या काळजात झिरपू लागला.
अनुपम जोशी यांनी श्री रागात भावगहिरे आलाप जोड व झाला यांची प्रशांत पेशकष केली. मपनिसारे, निसारे, पनिसारे, परे, कोमल रिषभ, धैवत व तीव्र मध्यमाच्या सुरावटीने ‘श्री’ च्या संगतीने संगीत सांजवेळ रसिक हृदयावर चढत गेली. त्यानंतर त्यांनी बिहाग रागात मध्यलय झपतालात व द्रुत तीनतालात निबद्ध गती सादर केल्या. पंढरपूर, तुळजापूर व अक्कलकोटच्या मध्ये असलेल्या सिद्धरामेश्वर नगरीतील श्रोत्यांसाठी खास त्यांनी अभंगमाला कानडा हो विठ्ठलु, अबीर गुलाल उधळीत रंग, खेळ मांडियेला वाळवंटी बाई, इत्यादी अभंगाची झलक सादर करून प्रथम सत्राची सांगता केली. त्यांना शंतनु देशमुख यांनी तबल्याची तैय्यारीने, रंगतदार साथसंगत केली. तानपुरी या स्वरघोषवाद्यावर सुरेंद्र वैद्य यांनी साथसंगत केली. सरोदवादक अनुपम जोशी यांनी श्राेत्यांना दिली
सरोद वाद्याबद्दल माहिती.
सरोद हे वाद्य एकाच लाकडापासून अखंड बनवले जाते. त्यांच्या सरोदला मैहर सरोद असे नाव आहे. २५ तारा असून वरती तांबा धातूचा तुंबा असून पूर्वी तो भोपळ्याचा असायचा. दांडीवर चमकदार धातूची पट्टी असून डाव्या हाताच्या बोटांनी स्वर वादन केले जाते. तर उजव्या हाताने नारळाच्या करवंटीच्या तुकड्याने वाजवले जाते.
द्वितीय सत्र
पं. हरीष तिवारी यांनी यमनकल्याण राग सादर केला. द्वितीय सत्रात त्यांच्या भिमसेनी स्वरांनी सभागृह भारून गेले. त्यांनी प्रारंभी विलंबित झपतालात ‘पियाबिन कैसे कटे रतिया बैरन’ ही बंदिश सादर केली. किराणा घराण्याचा तरीही पं. भिमसेन जोशी यांच्या वैशिष्ट्यपूर्ण स्वरलगावाचा प्रभाव, संयमित सरगम, मंद्रात केलेली सुंदर कामगत, गमकेच्या जोरकस ताना, दमदार व तब्येतीने मांडणी यामुळे यमनकल्याण रंगत गेला.
त्यानंतर राग यमनमध्ये द्रुत तीनतालात त्यांनी ‘सखी येरी आली पियाबिन’ ही जनप्रिय बंदिश ढंगदार रीतीने सादर केली. दमदार ख्यालानंतर मिश्र काफी मध्ये
‘पिया तो मानत नाही’ ही ठुमरी नजाकतदारपणे गायिली.
त्यानंतर त्यांनी अभंग गायनाने श्रोत्यांना खिळवून ठेवले. ‘अणुरेणुया थोकडा तुका आकाशाएवढा’ हा अभंग सादर केला. जो भजे को हरी को सदा या भैरवीने त्यांनी सांगता केली. त्यांना संवादिनीची सुयोग कुंडलकर यांनी तर तबल्याची श्रुतिमनोहर साथसंगत केली.