सर्वपक्षीय नेत्यांनी शोकसभेत वाहिली सुनिल कामाठी यांना आदरांजली…
येस न्युज मराठी नेटवर्क : दिवंगत माजी नगरसेवक सुनिल कामाठी यांनी समाजातील गोरगरिबांसाठी केलेले काम मार्गदर्शक आहे, अशा शब्दात सर्वपक्षीय नेत्यांनी सुनिल कामाठी यांना रविवारी झालेल्या शोकसभेत आदरांजली वाहिली. हुतात्मा स्मृती मंदिरात रविवारी ही शोकसभा झाली.
माजी पालकमंत्री आ. विजयकुमार देशमुख म्हणाले, सुनिल कामाठी यांनी आयुष्यभर माणसे जोडली. ते सर्वांचे चांगले भाऊ, चांगला मित्र होते. धाकट्या भावाप्रमाणे त्यांनी माझ्यावर प्रेम केले. त्यांच्या जाण्याने माझे तसेच समाजाचे मोठे नुकसान झाले आहे. गोरगरिबांसाठी त्यांनी केलेले कार्य मार्गदर्शक ठरणार आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या मागे खंबीरपणे उभे राहू.
प्रणिती शिंदे म्हणाल्या, खूप कमी वेळात सुनिल कामाठी यांनी लोकांच्या मनावर राज्य केले. गोरगरिबांना त्यांचा मोठा आधार होता. समाजकार्याचा आदर्श त्यांनी ठेवला.डॉ. शिवरत्न शेटे म्हणाले, सुनिल कामाठी यांच्या जाण्याने समाजाचे मोठे नुकसान झाले आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी मधुमेह, उच्च रक्तदाब या आजारांकडे दुर्लक्ष करू नये. ह्रदय ब्लॉक होण्याची प्रक्रिया एका दिवसाची नसून अनेक दिवसांच्या दुर्लक्षामुळे हा त्रास होतो. त्यामुळे राजकीय, समाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी आरोग्याकडे दुर्लक्ष करु नये, असा मोलाचा सल्लाही डॉ. शिवरत्न शेटे यांनी याप्रसंगी दिला.यावेळी माजी शिक्षिका शीला पत्की यांच्या शोकसंदेशाचे वाचन करण्यात आले.
याप्रसंगी माजी राज्यमंत्री आमदार विजयकुमार देशमुख, आमदार प्रणिती शिंदे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे, माजी उपमहापौर पद्माकर काळे, माजी परिवहन समिती सभापती राजन जाधव, शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, राष्ट्रवादीचे नेते तोफिक शेख, नगरसेवक नारायण बनसोडे,संभाजी आरमार प्रमुख श्रीकांत डांगे, मनपा माजी विरोधी पक्षनेते नरेंद्र काळे, विशाल रोचकरी, पद्मशाली ज्ञाती संस्थेचे माजी विश्वस्त सदस्य सत्यनारायण गुर्रम, शिक्षीका अर्चना शिंदे, अबेद घडेवाले, शामराव धुरी, प्रा. आनंद जाधव, ॲड. सतिश गस्ती, बाबूराव जमादार, राज सलगर, डॉ. प्रियांका मिनगुले यांनी मनोगते व्यक्त केली.