येस न्युज नेटवर्क । नैराश्याच्या भरात वरोरा येथील महारोगी सेवा समितीच्या सीईओ, ज्येष्ठ समाजसेवक स्व. बाबा आमटे यांची नात आणि डॉ. विकास आमटे यांच्या कन्या डॉक्टर शीतल आमटे – करजगी यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. शीतल आमटे सध्या आनंदवनची संपूर्ण जबाबदारी सांभाळत होत्या. बाबा आमटे यांच्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व त्या करीत होत्या. मागील काही महिन्यांपासून आमटे परिवारात अंतर्गत संघर्ष पेटला होता. हा वाद अनेकदा चव्हाट्यावरही आला होता. शीतल आमटे या सर्व वादाच्या केंद्रस्थानी होत्या, असा आरोप वेळोवेळी झाला. हा अंतर्गत गृहकलह सुरू असतानाच आज त्यांच्या आत्महत्येचे वृत्त आलं. त्या मानसिक तणावात असल्याचे काही दिवसांपूर्वीच त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले होते हे विशेष.
शीतल आमटे यांनी विषाचे इंजेक्शन घेतल्याची माहिती समोर येत असून, हे विष घेतल्यावर त्यांना तातडीने वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं होतं, पण तिथे उपस्थित वैद्यकीय अधिकार्यांनी डॉ. शितल ह्यांचा मृत्यु झाल्याचं घोषित केलं. कुष्ठरोग्यांच्या आयुष्यात आनंद पेरणाऱ्या आनंदवनमध्येच ही धक्कादायक घटना घडल्याने सामाजिक वर्तुळ हादरलं आहे.