सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेतर्फे दिव्यांग बांधवांना दिला जाणारा उदर निर्वाह भत्ता गेल्या अनेक महिन्यापासून देण्यात आलेला नव्हता, याबद्दल लालबावटा दिव्यांग श्रमिक संघटनेच्या वतीने अनेक वेळा पाठपुरावा करण्यात आला परंतु आज करू उद्या करू म्हणत संबंधित अधिकारी टाळाटाळ करत होते. परंतु ९ ऑगस्ट रोजी सेंटर ऑफ ट्रेड युनियन्स आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने रे नगर प्रश्नांसंबंधी चर्चा करण्यासाठी शिष्टमंडळ गेले असता रे नगरच्या प्रश्नाबरोबरच माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी दिव्यांग बांधवांच्या उदरनिर्वाहाचा मुद्दा उचलून धरला आणि लवकरात लवकर दिव्यांग लाभार्थ्यांच्या खात्यावर उदरनिर्वाह भत्ता जमा करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला होता.
यावर महानगरपालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी ताबडतोब संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन उदरनिर्वाह भत्ता जमा करण्याचे आदेश दिले होते.त्याची अंमलबजावणी करत आज नोंदणीकृत दिव्यांग बांधवांच्या खात्यावर उदरनिर्वाहाची एकूण ४० लाख रुपये जमा करण्यात आले. याचा सुमारे अडीच हजार दिव्यांग बांधवाना लाभ मिळणार आहे. वर्षभराचा एकूण उदरनिर्वाह भत्ता चार टप्प्यात दिला जाणार असून आज पहिल्या टप्प्याची रक्कम जमा करण्यात आली आहे.पुढील तीन टप्पे वेळेच्या आत जमा करा अन्यथा पुन्हा सनदशीर मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा लालबावटा दिव्यांग श्रमिक संघटनेने दिला आहे.