- दिनांक 1 किंवा 2 सप्टेंबर रोजी सोलापूर शहरातील होम मैदान येथे महिला सशक्तिकरण अभियान अंतर्गत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा होणार, माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची उपस्थिती राहणार
- या अभियानासाठी संपूर्ण जिल्ह्यातून तीस हजार महिला लाभार्थी उपस्थित राहण्याचे नियोजन, यासाठी 400 बसेसची आवश्यकता
सोलापूर : मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा दिनांक 1 किंवा 2 सप्टेंबर 2024 रोजी सोलापूर शहरातील होम मैदान येथे नियोजित आहे. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातून 400 बस च्या माध्यमातून तीस हजार महिला लाभार्थी उपस्थित राहण्याचे नियोजन करण्यात येत असून हा वचनपूर्ती सोहळा यशस्वी होण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी परस्परात योग्य समन्वय ठेवून कामे करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियान पूर्वतयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, अतिरिक्त महापालिका आयुक्त संदीप कारंजे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुधीर ठोंबरे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आर. बी. काटकर, जिल्हा परिषदेचे महिला व बाल विकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय माळी, पोलीस उपाधीक्षक गृह विजया कुर्री, पोलीस उपायुक्त वाहतूक सुरेश खिरडकर, जिल्हा प्रशासन अधिकारी नगरपालिका वीणा पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यासह अन्य संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले की मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोळावा कार्यक्रम सोलापूर शहरातील होम मैदान येथे घेण्याचे नियोजित आहे. त्या अनुषंगाने सर्व शासकीय यंत्रणांनी त्यांच्यावर सोपविण्यात येत असलेले जबाबदारी अत्यंत काळजीपूर्वक व परस्परात समन्वय ठेवून पार पाडावी. या मेळाव्यासाठी किमान 25 ते 30 हजार महिला लाभार्थी संपूर्ण जिल्हाभरातून तालुका निहाय आणण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या 400 बसेसची व्यवस्था राज्य परिवहन महामंडळाने करावी. या मेळाव्यासाठी येणाऱ्या महिलांसाठी जेवण पाणी व अनुषंगिक व्यवस्था जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी करावी. सार्वजनिक बांधकाम विभागाने पावसाळी परिस्थिती पाहता योग्य मंडप व अनुषंगिक व्यवस्था योग्य पद्धतीने करावी असे निर्देश त्यांनी दिले.
या ठिकाणी येणाऱ्या लाभार्थ्यांसाठी किमान 250 मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करावी. महापालिकेने शहरातील स्वच्छतेबरोबरच होम मैदानाची ही स्वच्छता करून घ्यावी. पार्किंगची व्यवस्था पोलीस विभागाने पहावी. तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी योग्य नियोजन करावे. सर्वप्रथम सर्व विभाग प्रमुख यांनी त्यांच्या अधिनिस्त सहकारी अधिकाऱ्यांचे आदेश काढून घ्यावेत. निवासी उपजिल्हाधिकारी यांनी कामकाजाच्या सोयीसाठी अनुषंगिक समित्यांचे गठण करून प्रत्येक समितीला जबाबदारी सोपवावी, असेही जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सूचित केले.