रोटरी स्टटमॅन बर्ड सेंटर या केंद्राचे औपचारिक उदघाटन शुक्रवार दि. ११ जुलै रोजी सकाळी ९.०० वा रोटरीचे प्रांतपाल रो. सुधीर लातुरे आणि नियोजित प्रांतपाल रो. जयेश पटेल यांचे हस्ते सरस्वती मंदिर येथे होणार आहे. सर्व पक्षी प्रेमी मंडळींनी अवश्य उपस्थित राहावे. है केंद्र दर शनिवार आणि रविवार या दिवशी दुपारी ४:०० ते ६:०० या वेळेत पाहता येईल अशी माहिती प्रकल्प प्रमुख डॉ. राजीव प्रधान यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सोलापूर येथील सरस्वती मंदिर या प्रशालेत सोलापूरचे पक्षी वैभव’ या नावाने पक्ष्यांविषयी माहिती आणि छायाचित्रे यांचे एक दालन स्थापन करण्यात आले आहे. अमेरिकेतील प्रसिद्ध निसर्ग प्रेमी आणि पक्षी अभ्यासक कै. लिओनर्ड स्टटमन यानी दिलेल्या देणगी मधून या केंद्राची निर्मिती झाली आहे. या केंद्राला कै. स्टटमन यांचे नाव देण्यात आले आहे. स्टटमन हे अमेरिकेच्या मिशीगन राज्यातील लांसिंग येथील रहिवासी होते आणि रोटरीचे माजी प्रांतपाल होते. सोलापूरच्या वालचंद महाविद्यालयातील प्राणिशास्त्र विषयांचे निवृत्त प्राध्यापक डॉ. रमेश खटावकर यांची रोटरीच्या माध्यमातून स्टटमन यांची मैत्री झाली. हे पक्षी केंद्र या मैत्रीचे फलित आहे.

अनेकांना सोलापूरच्या पक्षी वैभवा विषयी फारशी माहिती नाही. सोलापूर हे अनेक वैविध्यपूर्ण आणि सुंदर पक्ष्यांचे वसतिस्थान आहे. अनेक स्थलांतरित पक्षी उदा फ्लेमिंगो, क्रेन्स, चक्रवाकासह अनेक बदके वगैरे पक्षी ठराविक ऋतूत सोलापूरला मुक्कामाला येतात. माळढोक हा दुर्मिळ पक्षी सोलापूर जिल्ह्यातील नान्नज येथे आढळेल. अशा या सोलापूरच्या पक्षी वैभवाची माहिती सगळ्यांना व्हावी, पक्षी निरीक्षणाची आवड निर्माण व्हावी आणि पक्ष्यांच्या संरक्षणा विषयी सर्वांनी जागरूक असावे या हेतूने हे केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या केंद्राच्या स्थापने मध्ये प्रा. डॉ. निनाद शहा आणि प्रा. व्यंकटेश गंभीर यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. सरस्वती मंदिर प्रशालेच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष श्री पांडुरंग देशमुख, अॅड. रघुनाथ दामले, यांनी या कामी अतिशय मोलाचे सहकार्य केले आहे. या दालनात १२० स्थानिक व स्थलांतरित पक्ष्यांचे फोटो आणि त्यांची माहिती दिली आहे. काही स्थानिक व काही स्थलांतरित पक्ष्यांचे आवाजही फोटो सोबत क्यू आर (QR) कोड देऊन ऐकण्याची सोय केली आहे.