उस्मानाबाद : पीक विमासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील गेल्या सहा दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा सातवा दिवस आहे. दरम्यान, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज सकाळीच कैलास पाटील यांची उपोषणास्थळी जाऊन भेट घेतली आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंशी झालेल्या चर्चेनंतर कैलास पाटील यांनी उपोषण मागे घेतला आहे. याबाबत त्यांनी घोषणा केली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा 2020 मधील पीक विमा, अतिवृष्टी नुकसानभरपाईच्या मागणीसाठी आमदार कैलास पाटील यांनी सुरु केलेल्या उपोषणाचा आजचा सातवा दिवस होता. वीमा कंपनीकडून उस्मानाबाद जिल्ह्याला 1200 कोटी रुपये येणे असून, या प्रमुख मागणीसाठी कैलास पाटील यांचे उपोषण सुरु केले होते. दरम्यान त्यांच्या याच उपोषणाला अनेक संघटना आणि राजकीय पक्षांनी देखील पाठींबा दिला होता. तर आज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील पाटील यांची भेट घेतली. तर विमा कंपनीशी बैठक घेऊ, तसेच सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीचे पैसे लवकरात लवकर देऊ, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तसेच उद्धव ठाकरेंसोबत झालेल्या चर्चेनंतर कैलास पाटील यांनी उपोषण मागे घेतले आहे.
सकारात्मक निर्णय झाल्याने उपोषण मागे…
याबाबत बोलतांना खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर म्हणाले की, नुकसानभरपाईचे उस्मानाबाद जिल्ह्याला 282 कोटी रुपये येणे आहे. त्यातील अतिवृष्टीचे 59 कोटी रुपये उद्या किंवा परवापर्यंत देण्याचा शासन निर्णय घेतला जाणार असल्याचं मदत आणि पुनर्वसन विभागाचे सचिव असीम गुप्ता यांनी सांगितले आहे. ऑगस्ट, सप्टेंबर,ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा 60 कोटीचा नुकसानभरपाईचा निधी देखील सोमवारपर्यंत जमा होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने जे काही विषय होते ते सर्व मार्गी लागण्याबाबत सकारात्मक निर्णय झाल्याने आमदार कैलास पाटील उपोषण मागे घेत असल्याची माहिती खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी दिली.