मुंबई : मनोज जरांगे पाटलांच्या अल्टिमेटमनंतर आता सरकारनंही जरांगे पाटलांना रोखण्याची रणनीती आखायला सुरुवात केली आहे. मराठा आरक्षणाच्या मोर्चाचं वादळ मुंबईवर धडकण्याआधीच राज्य सरकारकडून पडद्यामागे बऱ्याच हालचालींना सुरुवात झाली.
जरांगे पाटील यांच्याशी पडद्यामागून चर्चा सुरू
मनोज जरांगे यांना रोखण्यासाठी राज्य सरकारने त्यांच्याशी पडद्याआडून चर्चा सुरू केल्याची माहिती आहे. जरांगे पाटील यांची मनधरणी करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न सुरू आहे. मुख्यमंत्री स्वतः जरांगे पाटील यांच्या संपर्कात आहेत. जरांगे पाटील मुख्यमंत्र्यांचा मान राखणार की आंदोलनावर ठाम राहणार हे आता पाहावं लागेल.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापुढे आता आव्हान आहे ते मनोज जरांगे पाटील यांना रोखण्याचं. जरांगे पाटलांच्या सध्याच्या भूमिकेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: पडद्यामागच्या चर्चेत सहभागी झालेत. राज्य सरकार सध्या आरक्षणासाठी काय काय प्रयत्न करतेय हे मनोज जरांगे पाटलांना पटवून देणं सध्या सरकारसाठी गरजेचं आहे. मुख्यमंत्र्यांकडून बच्चू कडू, उदय सामंत तर भाजपकडून गिरीश महाजन हे मनोज जरांगे यांच्या सातत्याने संपर्कात आहेत. या विषयावर मुख्यमंत्री तातडीची बैठक बोलवणार असल्याचंही समजतंय.