मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी योगगुरू रामदेव बाबांवर टीका केली आहे. रामदेव बाबांसारखे लोक गोमूत्र, गोबर आणि कोरोनिल काढतात. अॅलिओपॅथीवर संशय घेतात. त्यामुळे आयएमएने रामदेव बाबांना नोटीसा पाठवल्या पाहिजे, असं सांगतानाच गोबर, गोमूत्र आणि रामदेव ही थेरपीच आता बंद करा, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे.
नवाब मलिक यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी रामदेवबाबांपासून ते केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. देशात कोरोनाचं संकट कायम आहे. अशावेळी गोमूत्र प्यायला सांगितलं जात आहे. रामदेव सारख्यांच्या औषधांच्या उद्घाटनाला केंद्रीय मंत्री जातात. हे नियम आणि कायद्याला धरून नाही. त्याचा आरोग्य मंत्रालयाने विचार केला पाहिजे. ज्या औषधांना वैद्यकीय मान्यता नाही, त्याविरोधात सरकारने कठोर भूमिका घेतली पाहिजे. जे लोक चुकीची माहिती पसरवत आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे, असं मलिक म्हणाले.