सोलापूर, दि. २४: माढा तालुक्यातील कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रुग्णसंख्या कमी करायची असेल तर प्रत्येक नागरिकांनी गृह विलगीकरण न राहता कोविड केअर सेंटरमध्ये राहावे, अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या.
कुर्डुवाडी येथे माढा तालुक्यातील कोविड१९ संबंधित उपाययोजनेबाबत आढावा बैठकीत भरणे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, कुर्डुवाडी नगराध्यक्ष समीर मुलाणी, माढ्याच्या नगराध्यक्ष मीनल साठे, जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे, पंचायत समितीचे सभापती विक्रम शिंदे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंंडे, उपविभागीय अधिकारी ज्योती कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ शीतलकुमार जाधव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ प्रदीप ढेले, लसीकरण समन्वयक डॉ अनिरुद्ध पिंपळे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री भरणे म्हणाले, कोरोना रुग्ण घरातील विलगीकरणात राहिल्यास कोरोनाचे नियम पाळले जातील, याची शाश्वती नाही. यामुळे संसर्ग वाढत आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन आणि ऑक्सिजनचा तुटवडा आहे. प्रत्येक तालुक्याला मिळणारा साठा जपून वापरावा. तालुक्यात पाच ठिकाणी कोविड केअर सेंटर तर नऊ ठिकाणी डेडीकेटेड कोविड हेल्थ केअर आहेत, याठिकाणी ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची सुविधा आहे ही जमेची बाजू आहे. खाजगी रुग्णालये कोविड केअर सेंटर चालविण्यास तयार असतील तर त्यांना त्वरित परवानगी द्यावी.
ऑक्सिजन, औषधे आणि इतर सुविधा याबाबत सुयोग्य नियोजन करा. येत्या आठवड्यात रेमडेसिवीर, ऑक्सिजनचा पुरवठा सुरळित होणार आहे. रुग्णवाहिका उपलब्ध आहेत, काही ठिकाणी चालक नसतील तर कंत्राटी तत्वावर भरती करावी. खाजगी रुग्णालये रुग्णांकडून जादा पैसे आकारत असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले.
पाच हजार लोकसंख्येच्या गावात कोविड केअर सेंटर सुरू करावे. त्यांना त्वरित परवानगी द्यावी.
आज १५ हजार लस उपलब्ध झाली असून लसीचे योग्य नियोजन करा, गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. लसीकरण जास्तीत जास्त करून घ्या, यामुळे मृत्यूदर कमी होण्यास मदत होणार आहे. पोलिसांनी लॉकडाऊनची कडक अमलबजावणी करावी, अशा सूचनाही भरणे यांनी दिल्या.
भाजी मंडई एकाठिकाणी येणार नाही, गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी. रेल्वेच्या रुग्णालयाबाबत अधिकाऱ्यांनी माहिती घ्यावी. अधिकाऱ्यांनी समन्वय ठेवून जनतेसाठी उपलब्ध राहावे. आलेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात ऑक्सिजन बेडसाठी तयारी करण्याच्या सूचना भरणे यांनी केल्या.
लसीकरणासाठी ग्रामपंचायत, दवाखाना येथे नोंदणी करून घ्यावी. नागरिकांना मोबाईलवर संदेश आला तरच लसीकरणाला यावे, विनाकारण गर्दी करू नये, असे डॉ. पिंपळे यांनी सांगितले.
कुर्डुवाडीत आणखी २२ ऑक्सिजन बेड
येत्या दोन दिवसात कुर्डुवाडी शहरातील अपूर्वा हॉस्पिटलमध्ये १५ आणि सर्वेश हॉस्पिटलमध्ये ७ ऑक्सिजन बेड उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
कदम यांनी तालुक्यातील कोरोना स्थिती आणि उपाययोजना याबाबत माहिती दिली.
कोरोना नियंत्रण कक्ष
माढा तालुक्यातील नागरिकांसाठी २४ तास नियंत्रण कक्ष उपलब्ध करण्यात आला आहे. २२३२७६ या नंबरवर संपर्क केल्यास ऑक्सिजन बेड, बेडची उपलब्धता, दवाखान्याची माहिती दिली जात आहे.