सोलापूर,प्रतिनिधी : विश्वाला शांती आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या इस्लाम धर्माचा पवित्र धर्मग्रंथ कुराण मधील आयात हटवण्याची मागणी करणारी याचिका वसीम रिजवी यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. वसीम रिजवी यांची कृती धार्मिक भावना दुखावणारी असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करा अशा मागणीचे निवेदन काँग्रेसच्या नगरसेविका फिरदोस पटेल यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजीमंत्री नसीम खान, माजी खासदार हुसेन दलवाई यांच्याकडे केली.
या निवेदनात असे म्हटले आहे की, धर्म ग्रंथातील काही वचनांचा विपर्यास्त अर्थ घेऊन ते धर्मग्रंथातून हटवण्याची मागणी रिजवी केली आहे. इस्लाम धर्म ताकद आणि जबरदस्तीच्या बळावर वाढला आहे मदरशातून दहशतवादाचे धडे दिले जात आहेत असा संतापजनक आरोप रिजवी यांनी केला आहे. कुराणकडे मोठ्या श्रद्धेने पहिले जाते. हा ग्रंथ म्हणजे इस्लामचा प्राण आहे. त्यातील 26 आयते दहशतवादाला खतपाणी घालतात अशी मुक्ताफळे रिजवी यांनी उडवली आहेत. देशातील सामाजिक स्वास्थ्य बिघडू पाहणाऱ्या रिजवीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.