महाराष्ट्रातील 39 विद्यापीठातील एनएसएसच्या 200 विद्यार्थ्यांचा सहभाग

सोलापूर, दि. 16- महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 17 ते 21 मार्च 2025 या कालावधीत विद्यापीठामध्ये प्रेरणा राज्यस्तरीय युवा नेतृत्व शिबिराचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये राज्यातील एकूण 39 कृषी, अकृषी, अभिमत विद्यापीठातील 200 विद्यार्थ्यांचा सहभाग असल्याची माहिती राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे यांनी दिली.

या राज्यस्तरीय शिबिराचे उद्घाटन सोमवार दि. 17 मार्च 2025 रोजी दुपारी तीन वाजता विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांच्या अध्यक्षतेखाली प्रसिद्ध वृत्तनिवेदक सागर जोशी यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे विभागीय संचालक डॉ. अजय शिंदे आणि माजी राज्य संपर्क अधिकारी डॉ. रामेश्वर कोठावळे तसेच विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, वित्त व लेखा अधिकारी डॉ. महादेव खराडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

पाच दिवस चालणाऱ्या या राज्यस्तरीय युवा प्रेरणा शिबिरामध्ये दररोज सकाळी योगा व प्राणायाम डॉ. शालिनी मस्के व तृप्ती अवताडे या घेणार आहेत. तसेच पहिल्या दिवशी दि. 17 मार्च रोजी उद्घाटनानंतर सायंकाळच्या सत्रात विद्यापीठातील विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे यांनी युवक नेतृत्व विकास या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. रात्री सांस्कृतिक कार्यक्रम होईल. दि. 18 मार्च रोजी डॉ. वीरभद्र दंडे, डॉ. वसंत कोरे, प्रा. शिवाजी पवार, प्रा. विकास पाटील, डॉ. उमाकांत चनशेट्टी, डॉ. प्रभाकर कोळेकर, डॉ. ज्योती माशाळे, सरपंच समाधान काळे, पत्रकार प्रशांत माने, आफताब शेख, सलमान पिरजादे, अंकिता पवार, डॉ. शीला स्वामी हे मान्यवर युवकांच्या व्यक्तिमत्व विकास तसेच नेतृत्व विकास आणि विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. सायंकाळी प्रशांत तकिक यांचे सांस्कृतिक कार्यक्रम होईल.

दि. 19 मार्च रोजी डॉ. यशपाल खेडकर, डॉ. अभिजीत जगताप, डॉ. गौतम कांबळे, प्रा. पंकज पवार, डॉ. विनायक धुळप, डॉ. चंद्रकांत चव्हाण, डॉ. प्रशांत पवार, डॉ. शिवाजी शिंदे, अनिल केंगार हे मार्गदर्शन करणार आहेत. दि. 20 मार्च रोजी ॲड. जावेद खरेदी, डॉ. शशिकांत तांबे, डॉ. विश्वनाथ आवाड, डॉ. अंजना लावंड, डॉ. शीला स्वामी, डॉ. राजशेखर हिरेमठ, डॉ. दीपक ननवरे, डॉ. अनिल घनवट, डॉ. महेंद्र कदम हे मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. दि. 21 मार्च रोजी दुपारी एक वाजता समारोपाचा कार्यक्रम कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर यांच्या अध्यक्षतेखाली होईल. यावेळी राज्य संपर्क अधिकारी निलेश पाठक, प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या युवा नेतृत्व शिबिराच्या यशस्वीतेसाठी विविध समित्या कार्यरत असल्याचे डॉ. राजेंद्र वडजे यांनी सांगितले.