मुंबईः करोना संकटाच्या काळात सर्वसामान्य नोकरदारांसाठी आधार ठरलेल्या लालपरीचा म्हणजे एसटीचा प्रवास महागणार असल्याची चिन्हे आहेत. करोना आणि इंधनदरवाढीमुळं झालेले नुकसानीमुळं एसटी महामंडळ भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.पेट्रोल- डिझेलच्या वाढत्या किंमती, जादा तिकीट दर, खासगी वाहतूकदारांच्या तीव्र स्पर्धेने हतबल झालेल्या एसटी महामंडळाने भाडेवाढ करण्याचा कटू निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे.
येत्या काही दिवसात एसटी महामंडळ भाडेवाढ करणार आहे. याबाबतचा प्रस्ताव महामंडळाने तयार केला आहे.एसटीचे दररोज २१ कोटी रुपयांचे उत्पन्न करोनाच्या काळात लाखांवर आले होते. जुलैमध्ये हे उत्पन्न ८ कोटीपर्यंत गेले होते. मात्र, पुरेसे उत्पन्न नसल्याने एसटी कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात अडचणी निर्माण होत आहेत. त्यासाठी राज्य सरकारची मदत घ्यावी लागत आहे.एसटी महामंडळाच्या १५ ते १६ हजार बस डिझेलवर धावत आहेत. त्यातील सध्या १० हजार गाड्या प्रवासी वाहतूकीसाठी धावत आहेत. त्यासाठी दररोज ८ लाख लिटर डिझेल लागत आहे. एसटीच्या महसुलाच्या ३८ टक्के महसूल हा इंधनासाठी खर्च होत आहे. महामंडळाच्या निर्णयामुळे सर्वसामान्य प्रवाशांना जादा भाडे मोजून एसटीचा प्रवास करणे भाग पडणार आहे. या वाढीमुळे एसटीच्या महसुलात काही प्रमाणात वाढ होईल, असे मानले जाते.