सोलापूर : श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान, वडाळा संचलित अॅग्री क्लिनीक अॅन्ड अॅग्री बिझनेस प्रशिक्षणाच्या माध्यमातून प्रशिक्षण घेतलेला विद्यार्थी धनाजी दत्तात्रय काटमोरे रा. पिंपरी (पा.) वैराग या विद्यार्थ्यास कृषि विस्तार कार्याचे राष्ट्रीय पातळीवरील द्वितीय क्रमांकाचा उत्कृष्ट कृषि उद्योजक पुरस्कार जाहीर झाला असून त्यांचा नवी दिल्ली येथे केंद्रीय कृषि व शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते 12 जानेवारी 2023 रोजी सन्मान करण्यात़ येणार आहे. सदर पारितोषिक वितरण सोहळयासाठी श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान या नोडल ट्रेनिंग इन्स्टीटयूटचे 40 नवीन उद्योजक व 10 कर्मचारी नवी दिल्ली येथे जाणार आहेत.
श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान, वडाळा संचलित अॅग्री क्लिनीक अॅन्ड अॅग्री बिझनेस प्रशिक्षणाच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातून एकूण 1322 विद्यार्थी प्रशिक्षित झालेले असून आजतागायत 795 विद्यार्थ्यांनी स्वत:चे भांडवल अथवा बॅकेतून लोन मिळवून स्वत:चे उद्योग उभा केले आहेत. या अनुषंगाने राज्य पातळीवर श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान या नोडल ट्रेनिंग इन्स्टीट्यूटला दि. 15 ऑगस्ट 2022 रोजी प्रथम पारितोषिक प्राप्त झाला होता. हा पारितोषिक वितरण सोहळा राष्ट्रीय कृषि विस्तार प्रबंध संस्था (मॅनेज) हैद्राबाद येथे महासंचालक डॉ. पी. चंद्रशेखर यांच्या हस्ते संस्थेचे प्रकल्प समन्वयक शामकुमार भंडारी यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले होते. धनाजी काटमोरे यांच्या कार्याबद्दल संपूर्ण पिंपरी गाव व वैराग शहर आणि लोकमंगल समूह तसेच श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान यांच्याकडून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.