येस न्युज मराठी नेटवर्क : शारदा प्रतिष्ठान संचलित सायकल लव्हर्स सोलापूर तर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त सोलापुरात प्रथमच आयोजित केलेल्या व्हर्च्युअल सायक्लाॅथानला स्मार्ट सोलापूरकरांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला.
कोवीड १९ च्या पार्श्वभूमीवर ही सायक्लाॅथान व्हर्च्युअल स्वरूपात घेण्यात आली. यामध्ये सहभागी सायकलस्वारांनी आपापल्या परिसरात सायकलिंग केले. सदर सायक्लाॅथान मधून प्रजासत्ताक दिनानिमित्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तंदुरुस्तीचा संदेश देण्यात आला.
सोलापुरमधून प्रथमच आयोजित केलेल्या व्हर्च्युअल सायक्लाॅथान मध्ये ७२व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ७२ किलोमीटर आणि २६ जानेवारी निमित्त २६ किलोमीटर अशा दोन स्वरूपाची होती.या मध्ये सोलापूर तसेच पंढरपूर, बार्शी, पुणे, नांदेड, कराड,लातूर, नागपूर, तुळजापूर, उस्मानाबाद, जालना या भागातून उत्स्फूर्त सहभाग नोंदवण्यात आला.
सशुल्क २२५ व मोफत १२८ असे एकूण ३५३ सायकलिस्ट सहभागी झाले होते.सशुल्क सायकलपटूना सायकलिंग जर्सी, फिनिशर मेडल, गुडी बॅग आणि सर्टिफिकेट देण्यात आले. इतर सायकलपटूना मोफत ई सर्टिफिकेट देण्यात येईल.
सोलापुरातील विविध मान्यवरांनी या व्हर्च्युअल सायक्लाॅथान मध्ये सहभाग नोंदवला. सदर सायक्लाॅथान यशस्वी करण्यासाठी सायकल लव्हर्सचे महेश बिराजदार, अमेय केत, डॉ. प्रविण ननवरे, अविनाश देवडकर, आदित्य बालगावकर यांनी परिश्रम घेतले.