पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात नव्याने समाविष्ठ कामाबाबत बैठक
सोलापूर : श्री क्षेत्र देहू, आळंदी, भंडारा डोंगर, पंढरपूर पालखी तळ व मार्ग विकास आराखड्यांतर्गत पंढरपूर व पालखी मार्गावर भाविकांना पायाभूत सुविधा देण्याच्या अनुषंगाने नव्याने समाविष्ट करावयाच्या कामांचा आराखडा तयार करण्यात येत आहे. याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी, वारकरी संघटना, विश्वस्त, महाराज मंडळी, व्यापारी, नागरिक, पत्रकार यांच्या सूचना, मते विचारत घेऊन सर्वंकष आराखडा तयार करण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज दिली.
जिल्हा नियोजन भवन येथे पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात नव्याने समाविष्ठ करावयाच्या कामाबाबत आढावा बैठकीत श्री. शंभरकर बोलत होते. बैठकीला खासदार डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामी, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी भारत वाघमारे, प्रांताधिकारी गजानन गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे, नगरपालिका मुख्याधिकारी अरविंद माळी यांच्यासह वारकरी संस्थानचे विश्वस्त, महाराज मंडळी, पंढरपूर येथील स्थानिक व्यापारी, नागरिक उपस्थित होते. आमदार समाधान आवताडे ऑनलाईन उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी शंभरकर म्हणाले, श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरला दररोज मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. त्याचबरोबर आषाढी, कार्तिकी, चैत्री व माघी या चार प्रमुख यात्रा भरतात. पंढरपुरात येणाऱ्या भाविकांना व स्थानिक नागरिकांना पायाभूत सुविधा मिळाव्यात यादृष्टीने आराखडा तयार करण्यात येणार आहे. यामध्ये मंदिरातील मूळ वास्तूचे जतन करून मंदिर व मंदिर परिसराचा विकास करण्यात येणार आहे. यामध्ये स्वच्छ पिण्याचे पाणी, रस्ते, वाहनतळ, गर्दी व्यवस्थापन यंत्रणा कार्यान्वित करणे आदी बाबींचा समावेश असणार आहे. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत नव्याने समाविष्ट करण्यात येणाऱ्या कामाबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरिक, व्यापारी संघटना, वारकरी यांनी लेखी सूचना आठवडाभरात द्याव्यात, याचाही विचार करण्यात येणार आहे.
आषाढी यात्रा कालावधीत पालखी सोहळ्याबरोबर मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. पालखी तळावर वारकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. परंतु काही ठिकाणी पालखी तळ अपुरे पडत असल्याने पालखी तळांचा देखील विस्तार करण्याबाबत या आराखड्यात समावेश करण्यात येणार आहे. यासाठी पालखी सोहळा प्रमुख, महाराज मंडळी यांच्या सूचनांही जाणून घेतल्या जातील. तसेच मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने वारकरी भाविकांच्या सुरक्षेसाठी मंदिर परिसरातील विद्युत रोहित्रे एकाच ठिकाणी एकत्र बसविण्यात येणार आहेत. चंद्रभागा नदीवरील नवीन घाट निर्मिती प्रस्तावित करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
सर्व शासकीय कार्यालये एकाच छताखाली
नागरिकांच्या सोयीसाठी सर्व शासकीय कार्यालये एकच छताखाली आणण्याचा विचार आहे. यासाठी नवीन प्रशासकीय इमारतीबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. नवीन प्रस्तावित आराखड्याबाबत कोणाला अधिकच्या सूचना द्यायच्या असतील तर स्थानिक पातळीवर प्रांत कार्यालय, तहसील कार्यालय येथे द्याव्यात. लेखी सूचनांचाही विचार केला जाईल, असेही श्री. शंभरकर यांनी सांगितले
पंढरपूर येथे दर्शनासाठी येणाऱ्या वारकरी भाविकांची मोठ्या प्रमाणात संख्या असते. त्यांना तत्काळ सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी मंदिर समितीच्या कार्यकारी अधिकारीपदी प्रांताधिकारीऐवजी अप्पर जिल्हाधिकारी या दर्जाच्या पदाची मागणी आराखड्यात करण्यात आली आहे. काशी विश्वेश्वराच्या धर्तीवर पंढरपूरचा विकास करण्यासाठी शिष्टमंडळाकडून केलेल्या पाहणीची माहिती जिल्हाधिकारी श्री.शंभरकर यांनी दिली.
वाहनतळाची संख्या वाढविणार
पंढरपुरात भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाहनांची संख्याही वाढत आहे. शहरात 1060 वाहने पार्क होतील एवढी क्षमता आहे. यामुळे शहरात सात ठिकाणी असलेल्या मोकळ्या जागेत शॉपिंग सेंटरसह वाहनतळ उभारण्यात येणार आहे. यामुळे आणखी 2200 चार चाकी वाहने पार्किंग होतील, असेही श्री. शंभरकर यांनी सांगितले.
मंदिर परिसर, मंदिर आणि दर्शनबारी याठिकाणी सोयीसुविधा देणे, 28 परिवार देवतांची मंदिरे यांचाही समावेश विकास आराखड्यात करण्यात आला आहे. प्रत्येक ठिकाणी भाविकांना समजण्यासाठी चिन्हे, खुणा, सूचना फलक लावण्यात येणार आहेत.
वाराणसीच्या धर्तीवर घाट, महाआरतीचे नियोजन करावे-खासदार महास्वामी
वाराणसी येथील घाटाप्रमाणे घाट बांधणी करावी. घाट बांधणीसाठी तज्ञ मंडळींचा समावेश करावा. तसेच चंद्रभागा नदीकाठी महाआरती बाबतही नियोजन करावे, अशा सूचना खासदार डॉ. महास्वामी यांनी केल्या.
पंढरपूर येथील स्थानिक नागरिकांसह श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी पंढरपुरात येणाऱ्या भाविकांना मुबलक व स्वच्छ पाणी मिळावे यासाठी नगरपालिकेच्या जलशुद्धीकरण यंत्राच्या क्षमतेत वाढ करावी. अंबाबाई मैदानाची जागा खेळण्यासाठी रहावी, कॉक्रिटीकरण करू नका, अशा सूचना आमदार आवताडे यांनी मांडल्या.
मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने याठिकाणी गर्दी होणार नाही, यादृष्टीने नियोजन करावे. मंदिर परिसरात चप्पल स्टॅंड, वाहन तळांवर इलेक्ट्रिक चार्जिंगची व्यवस्था करावी. शिवाय चंद्रभागा नदीत येणारे घाण पाणी स्वच्छ करण्याची व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे. पाणी तपासणी यंत्रणा बसविण्याची सूचना आमदार मोहिते- पाटील यांनी मांडली.
मंदिराचा विकास करताना मंदिर परिसरातील परिवार देवतांचाही विकास करावा. पूर्वीच्या गटार व्यवस्थेबरोबर दुसरी व्यवस्था करावी. नदीकाठी महाआरतीचेही नियोजन व्हावे, गोपाळपूर येथील नगरपालिकेच्या हद्दीतील जागेमध्ये सोलर प्लांट टाकण्याबाबत प्रस्तावित करावे. गर्दी टाळण्यासाठी प्रदक्षिणा मार्ग बाहेरच्या बाजुंनी नदीकाठावरून इलिव्हेटेड घ्यावा, अशा सूचना माजी आमदार श्री. परिचारक यांनी मांडल्या.
चंद्रभागा वाळवंटात वारकरी सांप्रदायाच्या प्रथा परंपरा जपण्यासाठी भजन, कीर्तन केले जाते. यासाठी वाळवंटाची वेळोवेळी स्वच्छता व मंदिराचे जतन करावे. वारकऱ्यांना व्यवस्थित दर्शन व्हावे, अशी मागणी श्री. औसेकर यांनी केली.
यावेळी प्रांताधिकारी तथा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी मंदिर व मंदिर परिसर, पालखी मार्ग व पालखी तळांवर करण्यात येणाऱ्या प्रस्तावित कामांची माहिती दिली. संत चोखामेळा स्मारक, संत तुकाराम महाराज संतपीठ परिसंस्थेचे निर्मिती करणे, संतवाणी नावाचे एफएम रेडिओ स्टेशन चालू करणे याबाबतही माहिती श्री. गुरव यांनी दिली.
मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी पंढरपूर शहरात करण्यात येणाऱ्या प्रस्तावित कामांमध्ये वाहनतळ, रस्ते विकास, उद्याने, शौचालय, पाणीपुरवठा आदी बाबींची माहिती दिली.
यावेळी श्री संत तुकाराम महाराज संस्थान, संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त, वारकरी संघटनेचे अध्यक्ष, महाराज मंडळी, स्थानिक नागरिक, व्यापारी यांनी वाहनतळ रस्ते घाट बांधणीबाबत विविध सूचना मांडल्या.आभार नगरपरिषद विभागाचे प्रशासन अधिकारी आशिष लोकरे यांनी आभार मानले.