सोलापूर – सोलापूरमधील शास्त्रीय संगीतप्रेमींसाठी आनंदाची बातमी असून प्रिसिजन फाउंडेशनच्या वतीने येत्या शनिवार व रविवार, दि. ७ व ८ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘प्रिसिजन संगीत महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. हा महोत्सव हुतात्मा स्मृती मंदिर, सोलापूर येथे संपन्न होणार असून देशातील नामवंत कलाकारांची मैफिल रसिकांना अनुभवता येणार आहे. अशी माहिती प्रिसिजन फाउंडेशनचे अध्यक्ष सुहासिनी शहा यांनी पत्रकार परिषदेत दिली. हा महोत्सव यंदा दहाव्या वर्षात पदार्पण करत असून सोलापूर शहराच्या सांस्कृतिक ओळखीचा अविभाज्य भाग बनला आहे. शास्त्रीय संगीत व कलांचा प्रचार-प्रसार करणे, नव्या श्रोत्यांमध्ये संगीताची गोडी निर्माण करणे आणि मोठ्या प्रमाणावर रसिकांपर्यंत कला पोहोचवणे, हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे.
पहिला दिवस : सतार आणि गायनाची मैफल
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी, शनिवार दि. ७ फेब्रुवारी रोजी दोन सत्रांत कार्यक्रम होणार आहेत.
पहिल्या सत्रात प्रख्यात सतारवादक निखिल पटवर्धन यांचे सतारवादन होणार असून त्यांना पांडुरंग पवार (तबला) यांची साथ लाभणार आहे.
दुसऱ्या सत्रात प्रसिद्ध गायिका मंजिरी कर्वे-आलेगावकर यांचे शास्त्रीय गायन होणार असून त्यांना सौरभ दांडेकर (हार्मोनियम), अजित किंबहुने (तबला) आणि प्राची जोगळेकर (तानपुरा) यांची साथ असेल.
दुसरा दिवस : बासरी, व्हायोलिन आणि स्वर-साधना
रविवार दि. ८ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या पहिल्या सत्रात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बासरीवादक एस. आकाश यांचे बासरीवादन होणार असून त्यांना ईशान घोष (तबला) यांची साथ लाभणार आहे. याच सत्रात यशेश रायकर यांचे व्हायोलिनवादन सादर होणार आहे.
महोत्सवाच्या अंतिम सत्रात सुप्रसिद्ध गायिका देवकी पंडित आपली स्वर-साधना रसिकांसमोर मांडणार असून त्यांना प्रशांत पांडव (तबला) व अभिषेक शिनकर (हार्मोनियम) यांची साथ लाभणार आहे.
हा संपूर्ण महोत्सव रसिकांसाठी नि:शुल्क असणार आहे. मात्र प्रवेशासाठी मोफत प्रवेशिका (फ्री पास) आवश्यक आहेत. प्रवेशिका मंगळवार दि. ३ फेब्रुवारीपासून हुतात्मा स्मृती मंदिर येथे सकाळी ९ ते १२ व सायंकाळी ५ ते ९ या वेळेत उपलब्ध असतील. प्रवेशिका मिळवण्यासाठी रसिकांनी सिकंदर शेख (मो. ९८२२८९९५९२) यांच्याशी संपर्क साधावा. प्रवेशिका प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर दिल्या जाणार असून आसनव्यवस्था त्यानुसार राहील. प्रिसिजन फाउंडेशनच्या वतीने आयोजित हा संगीत महोत्सव सोलापूरच्या सांस्कृतिक जीवनात भर घालणारा ठरणार असून शास्त्रीय संगीतप्रेमींनी या स्वरोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


