सोलापूर : येथील महाराष्ट्राचे माजी रणजीपटू तथा फिरकीपटू रोहित प्रकाश जाधव यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन च्या पुरुषांच्या वरिष्ठ गटाच्या संघ (रणजी चषक, विजय हजारे चषक, सय्यद मुश्ताक अली चषक स्पर्धा) निवड समितीत सदस्य म्हणून सलग तिसऱ्या वर्षी निवड करण्यात आली आहे.
BCCI भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या २०२५–२६ ह्या स्थानिक/डोमेस्टिक वर्षाच्या विविध स्पर्धा साठी पुणे येथे MCA अध्यक्ष आमदार रोहित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच CAC चेअरमन सचिन मुळे, सचिव कमलेश पिसाळ, सीईओ अजिंक्य जोशी यांच्या बैठकीत महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिलांचे विविध वयोगटाच्या संघाचे निवड समित्या तसेच प्रशिक्षक आणि सहाय्यक स्टाफ यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. यात सोलापूरचा यशस्वी फिरकीपटू तसेच माजी रणजीपटू रोहित प्रकाश जाधव यांची सलग तिसऱ्या वर्षी रणजी संघ निवड समिती मध्ये सदस्य म्हणून निवड झाल्याचे कळताच सोलापुरात क्रिकेट खेळाडू मध्ये जल्लोष आणि आनंद निर्माण झाला. रोहित जाधव हे पूर्वी महाराष्ट्राच्या १४ वर्षाखालील संघाचे निवड समिती प्रमुख होते तसेच गेले तीन वर्ष MPL मधील PBG कोल्हापूर टस्कर्स आणि यावर्षी महिन्यांच्या WMPL मधील सोलापूर स्मॅशर्स संघाचे मेंटॉर म्हणून काम पाहत आहेत. रोहित यांच्या मार्गदर्शनात यावर्षी पहिल्याच प्रयत्नात सोलापूरचा महिलांचा संघ अंतिम सामन्यात पोचला आणि उपविजेता ठरला असून 2023 मध्ये कोल्हापूर संघ MPL मध्ये अंतिम फेरीत खेळला होता.
गेल्यावर्षी त्यांनी इतर सहकारी सदस्य सोबत निवडलेला संघ विजय हजारे चषक स्पर्धेत उपांत्य फेरीत पोचला होता. तसेच सोलापूर जिल्हा क्रिकेट संघटनेच्या वरिष्ठ गटाच्या निवड समिती चे प्रमुख म्हणून देखील ते कार्यरत आहेत.