जिल्हा परिषदेच्या शाळांवरील शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदलीचा पहिला ऑनलाइन टप्पा नुकताच संपला आहे. त्या शिक्षकांना पुढच्या महिन्यात बदलीचे आदेश दिले जाणार असून ३० मेपर्यंत त्यांना नवीन शाळेत हजर व्हावे लागणार आहे. १२ जूनपासून शाळा सुरु होणार आहेत. सोलापूर जिल्ह्यातील दोन हजार ७९७ जिल्हा परिषद शाळांमधील दोन लाख १९ हजार विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा १५ एप्रिलपर्यंत संपणार आहे. त्यानंतर प्रगतिपुस्तक तयार करून १ मे रोजी सर्वांचाच निकाल जाहीर होईल.
२ मेपासून १५ तारखेपर्यंत जिल्हाअंतर्गत बदली झालेल्या शिक्षकांना त्या शाळांवरून दुसरीकडे बदली झाल्याचे आदेश वितरित केले जातील. १२ जूनपासून त्या शिक्षकांना ऑनलाइन बदली प्रक्रियेत मिळालेल्या नवीन शाळांवर हजर होणे बंधनकारक असणार आहे. दरम्यान, सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळांमधील ‘संवर्ग एक’अंतर्गत ५३ वर्षे वयोगटातील १८१ शिक्षकांची दुसऱ्या शाळांवर बदली झाली आहे.
त्यात गंभीर आजार, एक किडनी, अर्धांगवायू किंवा लकवा आजार झालेले शिक्षक, विधवा, परितक्त्यांचाही समावेश आहे. तर ‘संवर्ग दोन’मध्ये ९८ शिक्षक असून पती व पत्नी दोघेही शिक्षक असून त्या दोघांच्या शाळांमधील अंतर ३० किलोमीटर पेक्षा जास्त आहे, अशांचा समावेश आहे. ‘संवर्ग चार’मध्ये ७३८ शिक्षक असून त्यात एकाच शाळेवर पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेल्यांचा समावेश आहे. सर्वसाधारण संवर्गात एक हजार १७ शिक्षक असून त्यांचीही बदली झाली आहे.
जिल्हा परिषद शाळांवरील समाजशास्त्रा विषयाचे जवळपास २१० शिक्षक सध्या अतिरिक्त आहेत. त्यातील बहुतेक शिक्षकांनी उपशिक्षक होण्यासाठी सहमती दर्शवली आहे. त्यांचा प्रश्न पुढील दहा-पंधरा दिवसांत सोडवला जाणार असून तसे नियोजन करण्यात आले आहे. तर संचमान्यतेनंतर निश्चित होणारी रिक्त पदे पुन्हा भरली जातील, असेही प्राथमिक शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
जिल्हांतर्गत बदलीतील शिक्षक
संवर्ग एक – १८१
संवर्ग दोन – ९८
संवर्ग तीन – ७३८
बदलीतील एकूण – शिक्षक – १,०१७
ग्राम विकास विभागाच्या ऑनलाइन बदली प्रक्रियेत जिल्ह्यातील दोन हजारांहून अधिक शिक्षकांची दुसऱ्या शाळांवर बदली झाली आहे. १ ते १५ मेपर्यंत त्यासंबंधीचे आदेश शिक्षकांना दिले जातील. १६ ते ३० मेपर्यंत त्या शिक्षकांना बदली झालेल्या शाळांवर हजर व्हावे लागेल, असे प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर संजय जावीर यांनी कळविले आहे.