सोलापूर प्रतिनिधी: गेली कित्येक दिवसांपासून ज्या मुख्याध्यापक पदोन्नतीची प्रतिक्षा होती ती आज 16 सप्टेंबर रोजी अगदी सुरळीतपणे पार पडली. कोणाचीही काहीही तक्रार नाही, गोंधळ नाही, हसत खेळत ही प्रक्रिया पार पडली. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन समुपदेशन पध्दतीने पार पडली. दिव्यांग, अस्थिव्यंग व इतर अशा 200 उपशिक्षकांची मुख्याध्यापक पदी पदोन्नती करून समुपदेशन पध्दतीने पदस्थापना देण्यात आली. यामध्ये एकुण 56 दिव्यांग शिक्षकांना पदोन्नतीचा लाभ देण्यात आला. मागील पंधरा वर्षांपासून दिव्याखाली रखडलेली प्रक्रिया प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थीत पार पडल्याबाबत शिक्षणाधिकारी राठोड यांनी प्रशासन विभागाचे आभार मानले.
सर्व शिक्षक संघटना व प्रशासन यांच्यामध्ये उत्तम समन्वय साधण्याचे काम शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांनी यशस्वी रित्या पार पाडल्याबद्दल सीईओ स्वामी यांनी शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड व त्यांच्या सहकारी अधिकारी, कर्मचारी यांचे अभिनंदन केले.
सकाळी 11-00 वाजल्यापासून दुपारी तीन वाजेपर्यंत ही ऑनलाइन समुपदेशन प्रक्रिया सुरू होती. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, शिक्षण अधिकारी प्राथमिक संजयकुमार राठोड, उपशिक्षणाधिकारी जावीर हे मुख्यालयाच्या ठिकाणी उपस्थित होते तर प्रत्येक तालूका पंचायत समितीच्या ठिकाणी गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी पदोन्नती पात्र शिक्षकांसमवेत हजर होते. कोविडच्या पार्श्वभूमीवर एकाच ठिकाणी जास्त गर्दी टाळण्यासाठी ही प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतल्याचे यावेळी सीईओ स्वामी यांनी सांगितले. समुपदेशनाची संपूर्ण प्रक्रिया पार पडल्यानंतर सर्व संघटना प्रतिनिधींनी प्रशासनाचे आभार मानले.