सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात पीएचडीच्या 644 जागा निघाल्या आहेत. त्यासाठी पुणे, मुंबई , औरंगाबाद विद्यापीठातील उमेदवारांनी अर्ज केले आहेत. ‘PET’ परीक्षा नुकतीच पार पडली असून त्याचा निकाल बुधवारी जाहीर होणार आहे. तर 5 सप्टेंबरला मेरिट यादी लावली जाणार असून, त्यानंतर 15 सप्टेंबरपासून मुलाखती सुरू होणार आहेत.
विद्यापीठात यंदा प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर पीएचडीच्या जागा निघाल्याने तब्बल 60 टक्के प्राध्यापकांनी त्यासाठी अर्ज केले आहेत. पगारवाढ, प्रमोशन, प्राध्यापक होण्याचे स्वप्न, अशी त्यामागे विविध कारणे आहेत. आता “पेट’चे गुण आणि संबंधित विद्यार्थ्यांचे पदव्युत्तरचे गुण ग्राह्य धरून त्यांची मेरिट यादी जाहीर केली जाणार आहे. 5 सप्टेंबरला मेरिट यादी जाहीर झाल्यानंतर प्रवेश प्रक्रियेला सुरवात होणार आहे. तत्पूर्वी, विद्यापीठाने शुक्रवारी पेटची उत्तरपत्रिका विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. त्यावरील हरकतींवर निर्णय देऊन 25 ऑगस्टला निकाल जाहीर केला जाणार आहे. ऑनलाइन पद्धतीने झालेल्या पेट परीक्षेत प्रॉक्टरिंगचा वापर केल्याने परीक्षा पारदर्शक पार पडली, असा दावा विद्यापीठाने केला आहे. आता एका जागेसाठी तिघांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. त्यातून एका उमेदवाराची निवड होईल, अशी माहिती विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विकास कदम यांनी सांगितले.
“पीएचडी’ प्रवेशासाठी पार पडलेल्या पेट परीक्षेचा निकाल तीन दिवसांत जाहीर होईल. त्यानंतर मेरिट यादी जाहीर करून 15 सप्टेंबरपासून प्रवेश प्रक्रियेला सुरवात होईल. कुलगुरू व प्र-कुलगुरूंच्या मार्गदर्शनाखाली पारदर्शक पद्धतीने उमेदवारांची निवड होईल.
- डॉ. विकास कदम, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ
भूमिपुत्रांसाठी 90 टक्के जागा राखीव
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निकषांनुसार “पीएचडी’साठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. त्यामध्ये 90 टक्के जागा भूमिपुत्रांना म्हणजेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात शिक्षण घेतलेल्यांसाठी राखीव असणार आहेत. कोरोनाच्या काळात अनेकांच्या हातचे रोजगार गेल्याने यंदा पीएचडीसाठी इच्छुकांची गर्दी वाढली आहे. जवळपास दोन हजार 700 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. त्यामध्ये अंदाजित एक हजार उमेदवार दुसऱ्या विद्यापीठातील असल्याचेही विद्यापीठाकडून सांगण्यात आले.