मुंबई – ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमांतर्गत महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल श्री सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र राजभवन येथे शुक्रवारी पश्चिम बंगाल राज्य स्थापना दिवस सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी पश्चिम बंगालच्या लोकसंस्कृतीचे दर्शन घडवणारा लोकगीत व नृत्याचा कार्यक्रम सादर केला. यावेळी विद्यार्थ्यांची कला पाहून राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी मुक्तकंठाने प्रशंसा करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. प्रकाश महानवर, राज्यपालांचे उपसचिव एस. राममूर्ती, विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे, मुंबईतील बंगाली भाषिक निमंत्रित, विद्यापीठाचे विद्यार्थी कलाकार तसेच राजभवनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.






विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांनी यावेळी सजीव चित्रण करीत आपल्या कलाकृती राज्यपालांना भेट दिल्या. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी पश्चिम बंगालचे ‘एलो दुर्गा माँ’ लोकगीत, रवींद्रनाथ टागोर यांच्या दृष्टीतून पश्चिम बंगाल हे एकपात्री सादरीकरण, रैबेनशे लोकनृत्य व मुलींचे झुमर लोकनृत्य सादर केले. खूपच सुंदररित्या हा कार्यक्रम राजभवन मध्ये पार पडला. उपस्थित सर्वांनीच विद्यार्थ्यांच्या या कलेचे कौतुक केले.