सोलापूर : वारंवार गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांना ‘पहाट’ या उपक्रमांतर्गत सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी गुन्हेगार दत्तक योजना सुरू केली आहे. त्यामध्ये त्यांनी स्वतः दहा गुन्हेगारांना दत्तक घेतले असून त्यांना गुन्हेगारीपासून प्रवृत्त करून मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्न करीत आहे.
पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून गुन्हेगारी समजातील लोकांना बाहेर काढण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या पहाट ” उपक्रमांची पाळेमुळे सोलापूर जिल्ह्यात घट्ट होत आहेत. सप्टेंबर २०२४ मध्ये सुरू झालेल्या उपक्रमामध्ये पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगार समाजास बाहेर काढण्यासाठी विडा उचलला आहे.
पोलीस ठाणे हद्दीतील वारंवार गुन्हे करणारे लोकांची यादी तयार केली असून त्यांना व त्यांच्या कुटूंबांना आवश्यक असणारे रहीवासी दाखला, जात प्रमाणपत्र, रेशन कार्ड, मतदान कार्ड व आधार कार्ड अशी मुलभूत कागदपत्रे काढून देण्यास मदत केली आहे. जन्म दाखला ३२९, जातीचा दाखला १८५, अपंग प्रमाणपत्र ०८, घर बांधणी प्रस्ताव ०४, आधार कार्ड २३५, वाहन लायसन्स ०६, शेती प्रशिक्षण १२ वस्ती, खाजगी नोकरी ३६ पोलीस प्रशासनाने या गुन्हेगार कुटुंबीयांना दिले आहे.
पोलीस व गुन्हेगारी समाजातील लोकांचे संबंध सुधारले आहेत. परंतू गुन्हे करण्याची सवय असलेले व गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांना मुख्य प्रवाहात घेवून येण्यासाठी त्यांच्याशी पोलीसांचा नियमीत संपर्क येण्यासाठी सदर गुन्हेगारांना दत्तक घेण्याबाबत सूचित केले. तसेच त्याची अंमलबजावणी स्वतः पासून सुरू केली आहे. जिल्ह्यातील टॉप चे १० गुन्हेगार स्वतः दत्तक घेतले आहेत. तसेच अपर पोलीस अधीक्षक व पोलीस निरीक्षक स्था. गु.शा. यांना प्रत्येकी १० गुन्हेगार दत्तक दिले आहेत. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस अधिकारी यांना प्रत्येकी ०५ गुन्हेगार व पोलीस अंमलदार यांना प्रत्येकी ०२ गुन्हेगार दत्तक दिले आहेत. यानुसार पोलीस अधिकारी व अंमलदार हे दत्तक आरोपीच्या नियमीत संपर्कात राहून त्यांना गुन्हेगारी क्षेत्रातून बाहेर पडण्यास मदत करत आहेत.
अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी दत्तक घेतलेल्या गुन्हेगारांशी स्वतः संवाद साधला. त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी, उदरनिर्वाहाची साधने याबाबत स्वतः माहिती घेतली. तसेच त्यांना महाराष्ट्र शासनाचे व एकात्मिक आदिवासी विकास महामंडळाचे योजनाची माहिती देवून त्यासाठी आवश्यक कागद पत्रासह प्रस्ताव तयार करण्यात येत आहेत.