सोलापूर दिनांक : सोलापूर महानगरपालिका बोगस बांधकाम परवाना घोटाळा प्रकरणी अभियंता झेड ए नाईकवाडी वय 58 वर्षे, श्रीकांत खानापुरे वय 58 वर्ष व लिपिक आनंद क्षीरसागर वय 52 वर्ष सर्व राहणार सोलापूर यांना जिल्हा व सत्र न्यायाधीश जे.जे.मोहिते साहेब यांनी जामीन मंजूर केली.
यात हकीकत अशी की जानेवारी 2021 ते डिसेंबर 2022 या कालावधीत एकूण 96 प्रकरणे सोलापूर महानगरपालिका बांधकाम परवाना विभागातील अभियंते झेड ए नाईकवाडी ,श्रीकांत खानापुरे , लिपिक आनंद क्षीरसागर व इतरांनी संगणमत करून बांधकामाचे नकाशे मंजूर करण्याचे अधिकार हे त्यांना नाहीत हे माहीत असून देखील ते त्यांनी मंजूर केले. तसेच खोटे व बनावट बांधकाम परवाने त्यांनी दिले .तसेच सदर बांधकाम परवाने मंजूर केले बाबतचे आवक रजिस्टर, तसेच दिलेले 96 परवाने हे जाणीवपूर्वक नाश करून अथवा कोठेतरी विल्हेवाट लावून महापालिकेचे सुमारे 2 कोटी दहा लाख तीस हजार चारशे त्रेचाळीस रुपये रुपयांचे आर्थिक नुकसान केले असे दोषारोप पत्रकात नमूद करण्यात आले होते.
सदर घटने बाबतची फिर्याद दि. 25.08.2024 रोजी उपअभियंता बांधकाम परवाना विभाग सोलापूर महानगरपालिका नीलकंठ शिवानंद मठपती यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात दिली होती.
आपणास जामीन मिळावा म्हणून वरील आरोपींनी जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता.
अर्जाच्या सुनावणीच्या वेळेस एडवोकेट मिलिंद थोबडे यांनी आपल्या युक्तिवादात सदरचा गुन्हा हा कागदोपत्री पुराव्यावर अवलंबून असून गुन्ह्याचा तपास पूर्णता संपलेला आहे त्यामुळे जामीनावर सोडल्यास सरकारी पक्षाचे कोणतेही नुकसान होणार नाही असा युक्तिवाद मांडला तो ग्राह्य धरून न्यायाधीशांनी 100,000 रुपयाच्या जात मुचुलक्यावर जामीन मंजूर केला.
यात आरोपींतर्फे एडवोकेट मिलिंद थोबडे एडवोकेट शशी कुलकर्णी एडवोकेट विनोद सूर्यवंशी यांनी तर सरकार तर्फे एडवोकेट दत्ता पवार यांनी काम पाहिले.