सोलापूर जिल्ह्यात देखील उष्णतेत मोठी वाढ झाली आहे. वाढत्या उष्णतेचा फटका थेट वीज वितरणच्या ट्रान्सफॉर्मरला बसत आहे. तापमानात वाढ झाल्यामुळं माढ्यातील वरवडे येथे ट्रान्सफॉर्मरचा स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. काल सोलापूर जिल्ह्यात तापमानाचा पारा सर्वच ठिकाणी वाढल्याचे दिसत असताना या अतिरिक्त उष्णतेचा फटका महावितरणच्या रोहित्रीला बसण्यास सुरुवात झाली आहे.
माढा तालुक्यातील वरवडे गावातील महावितरणच्या रोहित्राचा स्फोट होऊन आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीमुळं शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. त्या रोहित्रावर 125 किलोवॅट पेक्षा जास्त भार असताना देखील रोहित्र मात्र 63 केव्ही चा असल्याने, अतिरिक्त उच्च दाबामुळे व तीव्र उष्णतेमुळे महावितरणच्या या रोहित्राचा स्फोट झाला आहे. राज्यातील सर्वाधिक उष्णतेची नोंद जिल्ह्यात झाली असताना, याचा फटका शेतकऱ्यांना बसताना दिसून येत आहे. जळालेले रोहित्र तातडीने दुरुस्ती करून देण्याची मागणी आता शेतकऱ्यांकडून होत आहे