येस न्युज मराठी नेटवर्क : गोविंद नॅशनल पार्क (Govind National Park) मधील हिरवेगार जंगल, बर्फाने अच्छादलेले रस्ते, उंचच उंच पर्वतरांगा, संथ गतीने वाहणाऱ्या नद्या आणि नयनरम्य निसर्ग यांच्या सोबत ट्रेकचा प्रवास सुरू झाला. 12500 फूटची उंची गाठण्यासाठी जवळपास 20-21 किमीचे अंतर पार करावे लागते. सोलापूरचे गिर्यारोहक डॉ. सुनिल खट्टे, डॉ. निशिकांत काळेल, अमित माटे, डॉ. हर्षवर्धन जोशी यांनी उत्तराखंडमधील केदारकंठा (12500) हे शिखर सर करून 74 व्या प्रजासत्ताकदिनी 12500 फुटांवर 74 भारतीय ध्वजांचे ध्वज तोरण फडकवून आणि राष्ट्रगीत गाऊन साजरा केला. मुंबई मधील गिर्यारोहक वैभव ऐवळे 2018 पासून दरवर्षी स्वतंत्रतादिन ध्वज तोरण फडकावून साजरा करतात. त्यांच्याकडून प्रेरणा घेत ही मोहीम आखल्याचे डॉ. निशिकांत यांनी सांगितले.
उत्तराखंड मधील ‘केदारकंठा’ हा ट्रेक नेहमीच सर्व गिर्यारोहकांना खुणावतो. यासाठी मोठी जोखीम पत्करावी लागते. पण निसर्गाच्या आव्हानातील हे धोके पत्कारून मार्गक्रमण करणे हे धाडसाचे असते. संख्री येथून या ट्रेकची सुरवात झाली. पाठीवर अंदाजे 10/12 किलो वजनाची बॅग घेऊन हा ट्रेक सुरु झाला. प्रवासातला रस्ता हा खडी चढण आहे. दिवसातील सलग चार तास चढण केली जाते. गिर्यारोहकांसमोर एकूण बारा हजार पाचशे फूट उंचीवर चढाई करण्याचे आव्हान होते. अनेक अडचणींना सामोरे जात हे आव्हान त्यांनी पूर्ण केले.
उंचीवर जाताना वातावरणातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत जाते, उणे तापमान आणि वेगाने वाहणारे थंड वारे अशा नैसर्गिक अडचणींना सामोरे जावे लागले.
रात्रीच्या वेळी टेन्ट पूर्ण बर्फानी आच्छादून जात असे अशावेळी कसोटीचा क्षण येत, असे रात्रीच्या वेळी उणे दहा अंश सेल्सिअस तापमान होते आणि दिवसा 1 डिग्री सेल्सिअस तापमान असते. संपूर्ण चढाईच्या वेळी जवळपास 2/3 फूट बर्फातून प्रवास चालू होता. शेवटच्या टप्प्यावर आलेल्या अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून टीमने हा ट्रेक पूर्ण केला. या ट्रेकमध्ये सोलापुरातील चार डॉक्टरांचां समावेश होता. यातील डॉक्टर सुनील खड्डे यांनी यापूर्वी दक्षिण आफ्रिकेतील किलीमांजारो हे शिखर सर केलेले आहे.
” हा माझा दुसरा हिमालयीन ट्रेक होता आणि या ट्रेकनंतर माझा आत्मविश्वास वाढला आहे. हिमालयातील आणखी शिखरे पादाक्रांत करण्याचा माझा मानस आहे. गिर्यारोहणामुळे शारीरिक क्षमताबरोबरच मानसिक क्षमताही वाढते. दैनंदिन आयुष्यातही याचा फायदा होतो.”
-अमित माटे