सोलापूर, दि. ९ : अलीकडील काळात सीना नदीला आलेल्या पूरामुळे सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावे जलमय झाली होती. या नैसर्गिक आपत्तीत शेतकरी वर्गाचे तसेच नदीकाठावरील गावांमधील शाळांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्यही नष्ट झाल्याची बाब समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी महोदयांनी केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत सोलापूर महसूल विभागातील कर्मचारी बांधवांनी सामाजिक भान ठेवून पुढाकार घेतला. त्यांच्या एकत्रित प्रयत्नातून पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी एकूण ४०० शैक्षणिक साहित्य किट्स (वह्या, पेन, पेन्सील व कंपास) तयार करण्यात आले.
आज दिनांक ०९ ऑक्टोबर २०२५ रोजी सदर साहित्य किट्स अपर जिल्हाधिकारी (मदत कक्ष) मोनिका सिंह यांचेकडे औपचारिकपणे सुपूर्द करण्यात आले. या प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) सुशांत बनसोडे, उपजिल्हाधिकारी (रोजगार हमी योजना) अंजली मरोड, तहसीलदार (सर्वसाधारण) श्रीकांत पाटील हे मान्यवर अधिकारी उपस्थित होते.
या उपक्रमात महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी श्री. शंतनु गायकवाड, श्री. अमर भिगे, श्री. गजानन गायकवाड, श्री. सुभाष मोपडे, श्री. गंगाधर हाके, श्री. संदीप माने, श्री. महालिंग लोढे, श्री. निर्मल आगरखेड, श्री. विलास रणसुभे, श्री. रणजीत म्हेत्रे, श्री. लक्ष्मीकांत आयगोळे, श्री. अजीत कांबळे, श्री. विरु सुलगडले, श्री. मुदसर मगरूळकर, श्री. रवि नष्टे, श्री. विलास म्हेत्रे, श्री. प्रदीप शिंदे, श्री. ज्ञानेश्वर कराळे झारी, श्री. उमेश काळे, श्री. विजय इजेवाढ, श्री. समाधान राऊत, श्री. अक्षय गायकवाड, श्री. अविनाश स्वामी, श्री. वैभव मिसाळ, श्री. सजय मसने, श्री. काशीनाथ बुरांडे, श्री. दत्तात्रय कोळेकर, श्रीमती पदमा यादव, श्री. दिनानाथ पवार यांच्यासह अनेक कर्मचारी उपस्थित होते.
या उपक्रमामुळे पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक पुनरारंभासाठी आवश्यक साहित्य मिळाले असून, प्रशासनाच्या सामाजिक संवेदनशीलतेचे हे एक उत्कृष्ट उदाहरण ठरले आहे. महसूल विभागाच्या एकात्मिक सहभागातून समाजाभिमुख कार्याची प्रेरणा मिळत असून, अशा उपक्रमांमुळे प्रशासन आणि नागरिक यांच्यातील विश्वास अधिक दृढ होत आहे.