सोलापूर – जिल्हा रेशीम कार्यालय, सोलापूर यांच्यावतीने “रेशीम विभाग आपल्या दारी” ही विशेष मोहीम दि. १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२५ दरम्यान राबविण्यात येत आहे. दोन वर्षांपूर्वी रेशीम योजनेसाठी नोंदणी केलेल्या, परंतु तुती लागवड न करणाऱ्या शेतकऱ्यांच्या घरी जाऊन रेशीम उद्योगाची माहिती देणे, उद्योग सुरू करण्याचे आवाहन करणे आणि तुती लागवड न करण्यामागील कारणांचा अभिप्राय घेणे, हा या मोहिमेचा उद्देश आहे, अशी माहिती जिल्हा रेशीम अधिकारी विनीत पवार यांनी दिली आहे.
रेशीम विकास योजना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून राबविण्यात येत असून, अल्पभूधारक शेतकऱ्यांना सहभागी करून घेतले जाते. एका गावातील किमान ५ शेतकऱ्यांनी ग्रामसभेच्या संमतीने ग्राम रोजगार सेवकांच्या मार्गदर्शनाखाली अर्ज करावा लागतो. प्रति एकर ₹५०० नोंदणी शुल्क रेशीम कार्यालयात जमा करणे आवश्यक आहे.
मनरेगा अंतर्गत लाभ:
तुती लागवड व जोपासना: ₹२,१२,७८४ (तीन वर्षांत मजुरी)
किटक संगोपनगृह बांधकाम: ₹६६,४५६ (मजुरी)
साहित्य खर्च: ₹१,५३,०००
एकूण लाभ: ₹४,३२,२४० (तीन वर्षांत)
बहुभूधारक शेतकऱ्यांसाठी “सिल्क समग्र २” योजना:
तुती लागवड: ₹४५,०००
सिंचन व्यवस्था: ₹४५,०००
संगोपनगृह बांधकाम: ₹२,४३,७५०
संगोपन साहित्य: ₹३७,५००
निर्जतुकीकरण औषधे: ₹३,७५०
काम पूर्ण झाल्यानंतर अनुदान मंजूर
तुती लागवडीचे राज्यस्तरीय उद्दिष्ट:
मा. मुख्यमंत्री यांनी पावसाळ्यात १० कोटी तुती वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट जाहीर केले असून, रेशीम संचालनालयाला ४ कोटींचा लक्षांक देण्यात आला आहे. त्यापैकी २४ लाख वृक्ष (४०० एकर) लागवडीचे उद्दिष्ट सोलापूर जिल्ह्यासाठी निश्चित करण्यात आले आहे.
शेतकरी बांधवांनी पर्यावरणपूरक आणि शेतीपूरक रेशीम उद्योग सुरू करून रेशीम कोष निर्मितीच्या माध्यमातून उत्पन्नवाढ साधावी, असे आवाहन जिल्हा रेशीम कार्यालय, रेशीम पार्क, गट नं. ४२३/२, मौजे हिरज, ता. उत्तर सोलापूर यांच्यावतीने करण्यात आले आहे.