दत्तात्रय भरणेंच्या भेटीला यश
मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मुलाखत प्रक्रिया पाडण्याची गरज आहे. एमपीएसी उमेदवारांच्या मुलाखती घेणाऱ्या सदस्यांच्या नियुक्तीसाठीची फाईल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंजूर केली आहे.एमपीएससीच्या फाईल वर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची सही झालेली आहे. सामान्य प्रशासन विभागाकडे ती फाईल आली आहे. अधिसूचना निर्गमित करण्याची कारवाई सुरू आहे, अशी माहिती मिळाली आहे.
ठाकरे सरकारमधील सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी काल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. एमपीएसी सदस्य नियुक्तीची फाईल मंजूर करावी, अशी विनंती त्यांनी राज्यपालांना केली होती. दत्तात्रय भरणे यांच्या भेटीला यश आल्याचे दिसून आले आहे. एमपीएससीवर 31 जुलैपूर्वी सदस्य नियुक्त केले जातील अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केली होती. त्यानुसार राज्य सरकारने एमपीएससी सदस्य नियुक्तीची फाईल मंजूरीसाठी राज्यपालांकडे पाठवली होती. फाईलवर राज्यपालांची सही झाल्याने एमपीएससी सदस्यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकार नियुक्तीची अधिसूचना जाहीर करेल. त्यानंतर विविध परीक्षांच्या पात्र उमेदवारांच्या एमपीएससीच्या मुलाखती घेण्याच्या प्रक्रियेला वेग येणार आहे. राज्यात 2192 पदांसाठी 6998 उमेदवारांच्या मुलाखती घ्यायच्या आहेत. त्यासाठी एमपीएससीला जादा सदस्यांची गरज आहे.