सोलापुरातील होटगी रोडवरील विमानतळासाठी संपादीत करण्यात आलेल्या जमिनीपैकी २२ एकराच्या मालकी हक्कासंदर्भात अप्परजिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांच्याकडे सिध्देश्वर साखर कारखान्याकडून अपील करण्यात आले होते. याप्रकरणी तीन महिन्यात फेरचौकशी करून निर्णय देण्याचे आदेश अप्परजिल्हाधिकारी यांनी सोलापूरच्या प्रांताधिकार्यांना दिले आहेत.
सोलापूर विमानतळासाठी १९८४ साली जमिनीचे भूसंपादन करण्यात आले होते. यात मूळ मालक शेख यांच्या कुटूबांकडुन ४७ एकर जमिनीचे भूसंपादन करण्यात आले होते. यातील २२ एकर जमिन शेख कुटूंबांनी सिध्देश्वर साखर कारखान्यास विकली होती. मात्र वारस हक्काने शेख कुटूंबियातील सदस्यांची नावे संबधित उतार्यावर कायम राहिली आहेत. ही नावे कमी करुन २२ एकर जमिन विमानतळ प्राधिकरणाच्या नावाने करण्याचा प्रयत्न विमानतळ कंपनीकडुन सुरु आहे. वाद असलेल्या २२ एकर जमिनीची मोजणी भूमी अभिलेख विभागांच्या पथकांच्या उपस्थित करण्यात यावी. याबाबत संबंधित दस्तऐवज तपासून निर्णय घेण्यात यावा असे आदेश अप्परजिल्हाधिकारी ठोंबरे यांनी सोलापूर उपविभागीय अधिकारी कुमांक एक यांना दिले आहेत.
सोलापूर विमानतळावरुन विमानसेवा सुरु करण्याचा प्रयत्न शासन व प्रशासकीय स्तरावरुन गेल्या काही दिवसापासून सुरु आहे. त्यामुळे विमानसेवेत येणार्या सर्व अडचणी दूर करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडुन करण्यात येत आहे. विमानतळाच्या रनवे साठी नव्याने काम सुरु करण्यात आले आहे. तर प्रवासी विमान सेवेसाठी परवानगी राष्ट्रीय विमानसेवा मंत्रालयाकडून प्राप्त करण्याचेही प्रयत्न होत आहेत. मात्र विमानतळासाठी संपादीत करण्यात आलेल्या जमिनीच्या मालकी हक्काबाबत सोलापूर विमानतळ प्राधिकरण, सिध्देश्वर सहकारी साखर कारखाना व मूळ शेतमालक यांच्यात वाद सुरु झाल्याने हा विषय विमानसेवेसाठी अडचणीचा व गुंतागुंतीचा ठरत आहे.