घरबसल्या विजेत्यांना मिळणार हजारोंची बक्षिसे
सोलापूर : ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यात्रेनिमित्त वीरशैव व्हीजनतर्फे यंदाही सलग तिसऱ्या वर्षी ‘सिद्ध सजावट स्पर्धे’चे आयोजन करण्यात आल्याची माहिती वीरशैव व्हीजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मागील दोन वर्षे कोरोनामुळे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यांच्या यात्रेवर निर्बंध आले होते. अशावेळी घरबसल्या भक्तांना सिद्धेश्वरांची भक्ती करता यावी, त्यांचे जीवन चरित्र समजून घेता यावे, त्यांनी केलेल्या कार्याचा परिचय व्हावा तसेच भक्तांच्या कल्पकतेला आणि सृजनशीलतेला वाव मिळावा यासाठी गेली दोन वर्षे ‘सिद्ध सजावट स्पर्धा’ घेण्यात आली होती. यंदा यात्रा मोठ्या प्रमाणात होणार आहे. तरीही स्पर्धकांच्या मागणीनुसार यंदाही सिद्ध सजावट स्पर्धा घेण्याचे ठरले आहे.
स्पर्धेसाठी सिद्धरामेश्वरांचे अध्यात्मिक आणि धार्मिक कार्य, सिद्धरामेश्वरांचे विचार, सिद्धरामेश्वरांचे समाजीक कार्य, सिद्धरामेश्वर यात्रेतील विधी, गड्डा यात्रा, सिद्धरामेश्वर मंदिर परिसर, असे 5 विषय ठेवले आहेत. स्पर्धेसाठी एक अट आहे. ती म्हणजे घरामध्ये सिद्धेश्वर यांची प्रतिमा अथवा मूर्ती स्थापन करूनच त्यासमोर सजावट करावयाची आहे.
सदरहू स्पर्धा संपूर्ण कुटुंबासाठी असून सर्वांसाठी खुली आहे. 8 जानेवारी पर्यंत या स्पर्धेसाठी नाव नोंदणी करता येईल. स्पर्धकांनी 9604045418, 9657096190 या क्रमांकावर संपर्क साधून नोंदणी करावी.
स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना प्रथम बक्षीस 15 हजार रु एम. के. फाउंडेशनतर्फे महादेव कोगनुरे यांच्यावतीने, द्वितीय बक्षीस 11 हजार रु स्व. बाळासाहेब शिंदे यांच्या स्मरणार्थ माजी विरोधी पक्षनेता अमोल शिंदे यांच्याकडून, तृतीय बक्षीस 9 हजार रु कै. गीताई गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या स्मरणार्थ श्रीरंग महाराज औसेकर यांच्याकडून, चतुर्थ बक्षीस 7 हजार रु कै. रावसाहेब ढेपे यांच्या स्मरणार्थ प्रवीण ढेपे यांच्याकडून, पाचवे बक्षीस 6 हजार रु अजित खाडिलकर यांच्याकडून, सातवे बक्षीस 5 हजार रु कै. गंगाधर शेटे यांचे स्मरणार्थ शिवानंद शेटे यांच्याकडून, आठवे बक्षीस 4 हजार रु कै. टोपणप्पा कल्लूरकर यांच्या स्मरणार्थ सिद्धेश्वर कल्लूरकर यांच्याकडून, नववे बक्षीस 3 हजार रु गिरजाबाई कल्लूरकर यांच्या स्मरणार्थ सिद्धेश्वर कल्लूरकर यांच्याकडून तर उत्तेजनार्थ 1 हजार रुपयांची 5 बक्षिसे कै. बसवराज दुलंगे यांच्या स्मणार्थ आशिष दुलंगे यांच्याकडून दिली जाणार आहेत. विजेत्या स्पर्धकांना स्व. धर्माजी भोसले यांच्या स्मणार्थ माजी नगरसेवक विनोद भोसले यांच्याकडून स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत.
तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना भेटवस्तू व सहभाग प्रमाणपत्र कै. काशिनाथ दुलंगे यांचे स्मरणार्थ डॉ. अजित दुलंगे यांच्यावतीने देण्यात येणार आहे. या स्पर्धेत सोलापूरवासियांनी व समस्त सिद्धेश्वरभक्तांनी सहभागी व्हावे असे आवाहन उत्सव समिती अध्यक्ष चिदानंद मुस्तारे यांनी केले आहे.
पत्रकार परिषदेस नागेश बडदाळ, आनंद दुलंगे, सोमेश्वर याबाजी, विजय बिराजदार, राजेश नीला, बसवराज जमखंडी, सचिन विभुते आदी उपस्थित होते.