अहमदनगर जिल्ह्यातील तालुका कर्जत मधील टाकळी खंडश्वरी गावातील भावंड : अमोल पवार व विनोद पवार मागील २० वर्षांपासून डाळिंब उत्पादन घेत आहेत. दत्तकृपा सेंद्रिय गटाचे ते सदस्य असून त्यांना रेसिड्यू फ्री उत्पादनाचे प्रमाणपत्र मिळाले आहे. निर्यातदार क्षमतेचे डाळिंब उत्पादन घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. उन्हाळ्यात त्यांच्या भागात सिंचनासाठी पाण्याची कमतरता भासते.डाळिंब बागेत प्रामुख्याने हस्त बहर धरला जातो. दरवर्षी एकरी सरासरी १४ ते १५ टन उत्पादन मिळते. यावर्षी त्यांच्या डाळींबाला प्रतिकिलो सरासरी १०० रुपये, तर सर्वाधिक ११० रुपयांपर्यंत दर मिळाला. दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण डाळिंब फळांची निर्यातही केली जाते.बांगलादेश, कर्नाटक,केरळला त्यांचा माल जात आहे.
जिल्हा कृषी विभागाकडून कृषी व्यवसायामधील योगदानाबद्दल वर्ष 2014 2015 साली प्रगतशील शेतकरी पुरस्कार व वर्ष 2019 मध्ये जिल्हास्तरीय उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार व सन्मान चिन्हाने पुरस्कृत करण्यात आले.
मागील कामकाज
दरवर्षी साधारण जानेवारी महिन्यात अंबे बहार धरण्याचे नियोजन केले जाते. त्यानुसार सर्व कामांचे नियोजन केले जाते. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात बागेला बेसल डोस भरुन घेतला जातो (ताण कालावधीत बागेला प्रति झाड चांगले कुजलेले शेणखत १० किलो प्रमाणे दिले. त्यानंतर जैविक खतांचे बेसल डोस देण्यात आले. त्यात निंबोळी पेंड ४०० किलो , गंधक ५० किलो आणि ट्रायकोडर्मा १० किलो प्रति एकर प्रमाणे दिले . तर कृषी आमृत २.५ किलो प्रति झाड. तर दुसर्या आठवड्यामध्ये बागेची छाटणी करून घेतली. छाटणी केलेल्या फांद्याची योग्य विल्हेवाट लावली जाते. व शेवटच्या आठवड्यात इथ्रेलची फवारणी घेऊन पान गळ केली जाते.छाटणी झाल्यानंतर बोर्डो मिश्रणाच्या १५ दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या घेतल्या जातात व सुरुवातीला कळी सेटिंग साठी जैविक कीटकनाशकांचा वापर केला जातो जेणेकरून परागीभवनावरती परिणाम होत नाही. छाटणीनंतर बागेत तेल्या रोग आणि पिनहोल बोररचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. तेल्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जैविक कीटकनाशके आणि जैविक बुरशीनाशकांच्या दर १५ दिवसांच्या अंतराने आलटून-पालटून फवारण्या घेतल्या जातात.पिनहोल बोररचा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बागेतील मुख्य खोड आणि काडीवरील वॅाटरशूट काढून घेतले जाते तर क्लोरोसायपरने खोड धोऊन घेतले जाते.
आगामी कामकाज
- सध्या बाग ताणावर असून, ऑक्टोबर महिन्यात बहार धरण्याचे नियोजन आहे.
- दर ८ दिवसांतून एकदा ०ः०ः५० आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी केली जाईल.काडी फुगवणीसाठी ०ः०ः५० हे १५ ग्रॅम आणि सूक्ष्म अन्नद्रव्य १ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे दर आठ दिवसांतून एक फवारणी घेतली जाईल.
- तणनियंत्रणासाठी तणनाशकांचा वापर टाळला जातो. मजुरांच्या मदतीने तणनियंत्रण केले जाईल.
- जमिनीतील वाफसा आणि पाऊस यांचा अंदाज घेऊन ठिबकद्वारे सिंचन केले जाईल