दररोज १ हजार भाविकांना मिळणार दर्शनाचा लाभ
पंढरपूर : सचिन झाडे : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर दिपावली पाडव्याच्या दिवसापासून सुरु होणार आहे.आहे.तसेच कोरोनाबाबत प्रतिबंधक उपपायोजना करत भाविकांना दर्शनाची नियोजन केले जाणार आहे.परंतु भाविकांना विठ्ठलाच्या पदस्पर्शना ऐवजी मुखदर्शन देण्याचे नियोजन श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समितीने केले.
श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुख दर्शन पहाटे ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत घेता येणार आहे. दररोज एक हजार भाविकांना दर्शन दिलं जाणार असून फक्त ऑनलाइन बुकिंग करणा-या भाविकांनाच दर्शन घेता येणार आहे. तसेच शासनाने तोंडावर मुखपट्टी, योग्य अंतर, सॅनिटायझरचा वापर आदी नियम बंधनकारक असल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी आणि सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महारज औसेकर यांनी दिली आहे.
राज्यातील सर्व मंदिरे सोमवारपासून भाविकांसाठी खुली करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पंढरपुरातील श्री विठ्ठल मंदिर भाविकांसाठी खुले करण्याबाबत बैठक झाली. यानंतर या बैठकीतील निर्णय मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी आणि सहअध्यक्ष यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केला. दररोज सकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत दर्शनास परवानगी दिली आहे. तसेच सर्व भाविकांना दर्शनासाठी संकेतस्थळावर जाऊन दर्शनाची वेळ निश्चित करावी लागणार आहे. ज्या भाविकांनी अशा पद्धतीचे दर्शन बुकिंग केले त्यांनाच दर्शनासाठी परवानगी दिली जाणार आहे. तसेच येणा-या भाविकांनी ओळखपत्र आणणे गरजेचे आहे. याशिवाय येणा-या भाविकांची थर्मल तपासणी, सॅनिटायझरचा वापर, तोंडावर मुख्पट्टी असणे बंधनकारक आहे. एखाद्या भाविकाला ताप, सर्दी खोकला आदी लक्षणे दिसून आली तर त्या भाविकाला दर्शनास सोडण्यात येणार नाही.
पंढरीत दर्शनाला येणा-या भाविकांनी संकेतस्थळावरून दर्शनाची तारीख आणि वेळ निश्चित करा, जास्त गर्दी करू नका, शासनाच्या नियमाचे पालन करून समितीस सहकार्य करा, असे आवाहन मंदिर समितीचेसह अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ औसेकर यांनी केले आहे. एकंदरीत आता भाविकाना सावळ्या विठुरायाच्या दर्शनाची ओढ लागली आहे.
दर्शनाची अशी असेल व्यवस्था
याशिवाय ६५ वर्षापुढील, १० वर्षाखालील आणि गर्भवती महिलांना मंदिरात दर्शनासाठी परवानगी नाही. प्रत्येक तासाला १०० भाविक दर्शनासाठी सोडण्यात येणार असल्याचा बैठकीत निर्णय झाला आहे. सकाळी ६ ते ७, ८ ते ९, १० ते ११, ११ ते १२, दुपारी १२ ते १, २ ते ३, ३ ते ४, संध्याकाळी ५ ते ६, ७ ते ८ आणि ८ ते ९ या कालावधीत भाविकांना दर्शन घेता येईल अशी माहिती जोशी यांनी दिली आहे.