राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत श्री सिद्धेश्वर महायात्रेचा कृती आराखडा तयार करावा
-अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर
श्री सिद्धेश्वर महा यात्रेचे दिनांक 12 ते 16 जानेवारी 2025 या कालावधीत आयोजन
होम मैदानावरील मनोरंजन नगरीसाठी विक्रेते व स्टॉल धारक यांच्याकडून जागेची अचूक मागणी घ्यावी
सोलापूर, दिनांक 16 (जिमाका)- श्री सिद्धेश्वर महायात्रा दिनांक 12 ते 16 जानेवारी 2025 या कालावधीत होत असून यासाठी श्री सिद्धेश्वर मंदिर व होम मैदान येथील मनोरंजन नगरीमध्ये संपूर्ण महिनाभर प्रतिदिन हजारो भाविक येतात. त्यामुळे या कालावधीत कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत श्री सिद्धेश्वर महा यात्रेचा कृती आराखडा तयार करावा व ही महायात्रा शांततेत व नियोजनबद्ध रीतीने पार पाडण्यासाठी सर्वांनी परस्परात समन्वय ठेवावा, असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित श्री सिद्धेश्वर महायात्रा 2025 अंतर्गत पूर्वतयारी आढावा बैठकीत अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर मार्गदर्शन करत होत्या. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपविभागीय अधिकारी सदाशिव पडदुने, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे, शहर अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मनोज ठाकरे यांच्यासह पोलीस व संबंधित विभागाचे अधिकारी तसेच देवस्थान पंच कमिटीचे सदस्य उपस्थित होते.
अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर पुढे म्हणाल्या की, यात्रा कालावधीत मंदिर, मंदिर परिसर व होम मैदान या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था अत्यंत चोख असावी. पोलीस विभागाने यात्रा कालावधीत नियुक्त करण्यात येणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे योग्य नियोजन करावे. होम मैदानावर होणाऱ्या मनोरंजन नगरीसाठी मंदिर समिती, पोलीस प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग व महापालिकेने एकत्रित बसून कृती आराखडा तयार करावा. तसेच या ठिकाणी स्टॉल लावणारे विक्रेते यांना त्यांच्या स्टॉलसाठी किती जागा आवश्यक आहे याची बिनचूक मागणी नोंदवून त्या पद्धतीने नियोजन करावे व सुरक्षेच्या दृष्टीने हे स्टॉल सुटसुटीत असणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
श्री सिद्धेश्वर महायात्रा कालावधी जवळपास एक महिन्याचा असल्याने या कालावधीत सर्वसामान्य नागरिक भक्तगण यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही तसेच गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक विभागाने वाहन व्यवस्था पार्किंगची व्यवस्था आधी बाबीवर अधिक लक्ष द्यावे. यात्रा कालावधीत दिनांक 13 जानेवारी 2025 रोजी होणारा अक्षता कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर भाविक उपस्थित राहतात त्या अनुषंगाने काटेकोर नियोजन करावे. सर्व संबंधित शासकीय यंत्रणा तसेच श्री सिद्धेश्वर मंदिर देवस्थान पंच कमिटीचे सदस्य यांनी परस्परात योग्य समन्वय ठेवून ही महायात्रा शांततेत पार पाडावी यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत पुढील आठ दिवसात कृती आराखडा तयार करावा, असे निर्देश श्रीमती ठाकूर यांनी दिले.
प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी श्री सिद्धेश्वर महायात्रा 2025 अंतर्गत श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटी तसेच सर्व शासकीय यंत्रणावर असलेली जबाबदारी याची माहिती दिली. तसेच यात्रा कालावधीत कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत करावयाची कार्यवाही याचीही माहिती त्यांनी दिली.
उपविभागीय अधिकारी तथा इन्सिडेंट कमांडर पडदुने यांनी श्री सिद्धेश्वर माहेत्रा दिनांक 12 ते 16 जानेवारी 2025 या कालावधीत होत असून दिनांक 12 जानेवारी रोजी 68 लिंग प्रदर्शन 13 जानेवारी रोजी अक्षता कार्यक्रम 14 जानेवारी होम हवन असे कार्यक्रम होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तर पंच कमिटीचे सदस्य कस्तुरे व बिराजदार यांनी श्री सिद्धेश्वर देवस्थान समितीच्या वतीने यात्रा कालावधीत देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांची माहिती दिली.