सोलापूर : श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज यांच्या ६६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त सोमवारी (दि. ६) रोजी रात्री १०.४५ वाजता सम्राट चौकातील श्री प्रभाकर महाराज मंदिरात गुलालाचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिर ट्रस्टचे ट्रस्टी उदय वैद्य यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त सोमवार (दि. ६) पर्यंत मंदिरात अखंड नामजप सप्ताह श्री गुरुगीता पारायण करण्यात येत आहे. तसेच रविवारी (दि. ५) सकाळी १० वाजता श्री प्रभाकर अनुसंधान या पोथीचे सामूहिक अनुष्ठान मीना जोशी यांच्या अधिपत्याखाली होणार आहे. सोमवारी (दि. ६) सायंकाळी ६ वाजता ज्ञानेश्वर वाघमारे यांचा भजनसंध्या कार्यक्रम तर रात्री ९ वाजता प्रकाश कोथिंबीरे आणि दत्तात्रय कुसेकर यांच्या अधिपत्याखाली सांप्रदायिक भजन होणार आहे. याचदिवशी रात्री १०.४५ वाजता मंदिरात गुलालाचा कार्यक्रम होईल.
मंगळवारी (दि. ७) रोजी दुपारी १२ वाजता हजारो भाविकांना लाडू प्रसादाचे वाटप पोलीस उपयुक्त (परिमंडळ) विजय कबाडे त्यांच्या हस्ते होणार आहे. बुधवारी (दि. ८) रोजी श्री सद्गुरू प्रभाकर महाराज मंदिरापासून रथ मिरवणूक निघणार आहे. पोलीस उपायुक्त (गुन्हे शाखा) डॉ. दिपाली काळे यांच्या हस्ते प्रारंभी सकाळी ११ वाजता पालखी पूजा करण्यात येणार असून यानंतर तब्बल १० तास चालणाऱ्या रथ मिरवणुकीस प्रारंभ होणार आहे. या मिरवणुकीत सजवलेली पालखी, सजवलेला रथ, बँड पथक, बग्गी आदींचा समावेश असणार आहे.
पुण्यतिथी महोत्सवानिमित्त होणाऱ्या गुलाल, लाडू प्रसाद वाटप तसेच पालखी पूजा, रथ मिरवणुकीत भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टी उदय वैद्य यांनी केले.
या पत्रकार परिषदेस श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिर ट्रस्टचे ट्रस्टी दत्तात्रय देशमुख, मॅनेजिंग ट्रस्टी + बाळकृष्ण शिंगाडे, ट्रस्टी उदय वैद्य वसंत बंडगर, ट्रस्टी सदस्य वामन वाघचौरे, मोहन बोददु, रवी गुंड, सम्राट राऊत, बोड्डू रमेश देशमुख, रामभाऊ कटकधोंड, प्रभाकर कुलकर्णी, सुभाष बद्दूरकर आदी उपस्थित होते.